नोव्हेंबरमध्येच जलपर्णीने झाकली नदीपात्रे

मैलायुक्‍त, रासायनिक पाणी थेट नदीत ः डासांचा उपद्रव, दुर्गंधीमुळे नागरीक हैराण
शहराला होणारा पाणीपुरवठा 520 दश लक्ष लिटर
पाणी पुरवठ्यातून तयार होणारे 312 दश लक्ष लिटर सांडपाणी
तयार होणाऱ्या सांडपाण्यातून केवळ 265 दश लक्ष लिटरवर प्रक्रिया
एकूण 47 दश लक्ष लिटर सांडपाणी प्रकिया न करता थेट नदीत
सांगवी – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून तीन महत्वाच्या नद्या वाहतात. या नद्या साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर असे तीन महिने पावसाच्या पाण्याबरोबर जलपर्णी आणि इतर घाण वाहून गेल्यामुळ दुथडी भरुन झुळझुळ वाहणाऱ्या या नद्या शहराच्या सौंदर्यात मोठी भर घालतात. मात्र, हे सौंदर्य अल्प काळापुरते टिकणारे ठरते. ऑक्‍टोबर महिन्याच्या मध्यासच जलपर्णीने पुन्हा नदीत अस्तित्त्व निर्माण करण्यास सुरुवात केली आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत शहरात कित्येक ठिकाणी जलपर्णी नदीपात्र झाकू लागले.
ऑक्‍टोबर महिन्यातच महापालिकेने जलपर्णी काढण्याची आणि जलपर्णीसाठी पोषक वातावरण तयार होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असते. परंतु याउलट सांडपाण्याची योग्य व्यवस्था न करण्यात आल्याने जलपर्णी वाढतच जाते. जलपर्णी फोफावण्यास पोषक असलेले घटक थेट नदीपात्रात सोडले जातात. त्यामुळे नोव्हेंबरमध्येच पात्रातील पाण्यावर तरंगताना दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे चक्र यावर्षीही थांबले नाही, उलट यावर्षी जरा लवकरच जलपर्णी आणि त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि डास अधिकच वाढत आहे.
त्यातच लाखो लिटर मैलायुक्त, रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. नदीपात्रात दूषित पाणी सोडणाऱ्यांवर महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे कोणतेही नियंत्रण नाही. ठोस कारवाई केली जात नाही. फक्‍त शंभर रुपये दंड आकारून कारवाईचे नाटक केले जाते. त्यामुळे वरचेवर नदीपात्र दुर्गंधीने बरबटले आहे. हेच कारण जलपर्णी वाढण्यास पोषक ठरते. परिणामी नोव्हेंबरपासूनच जलपर्णीचे पात्रात मैदान तयार होते. यंदाही हीच परिस्थिती उद्‌भवली आहे. तरीही महापालिकेकडून अद्याप जलपर्णी काढण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. दरवर्षी जलपर्णी काढण्याचे काम एकाच ठेकेदाराला देण्यात येते. यंदा मात्र, मुळा, पवना आणि इंद्रायणी नदी पत्रातील जलपर्णी काढण्याचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्यात येणार असल्याचे समजते, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
पालिकेसमोर प्रदूषण नियंत्रण मंडळ हतबल
नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास जबाबदार धरले जाते. परंतु याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वतः पालिकेची पोलखोल केली आहे. अधिकृत माहितीनुसार पिंपरी-चिंचवड शहराला रोज 520 दशलक्ष लिटर प्रति दिन इतका पाणी पुरवठा केला जातो. त्यातून 312 दश लक्ष लिटर प्रति दिन इतके घरगुती सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी 47 दशलक्ष लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. हेच सांडपाणी जलपर्णीसाठी पोषक ठरते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घरगुती सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी 13 एसटीपी बांधले आहेत. या सर्व एसटीपीची एकत्रित क्षमता 333 दश लक्ष लिटर इतकी आहे. परंतु शहरमध्ये सर्वत्र भुयारी गटार योजना अस्तित्वात नसल्यामुळे सद्यस्थितीमध्ये केवळ 265 दश लक्ष लिटर प्रति दिन इतके घरगुती सांडपाणी प्रक्रिया करून इंद्रायणी, पवना तसेच मुळा नदीमध्ये सोडले जाते. याचाच अर्थ की 47 दश लक्ष लिटर प्रति दिन सांडपाणी प्रक्रिया न करता थेट शहरातून वाहणाऱ्या तीनही नद्यांमध्ये सोडले जात आहे.
जलपर्णी काढून टाकण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पर्यावरण विभागातर्फे महापालिकेच्या आरोग्य विभागाला निवेदन देण्यात आले असून, जलपर्णी काढण्यास सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेने लवकरात लवकर तीनही नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकण्याची व्यवस्था करावी. तसे न झाल्यास पुढील महिन्यातच नदीपात्र बघण्यालायक राहणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर जलपर्णी काढण्याची व्यवस्था करावी. अन्यथा नदीपात्रातील जलपर्णी महापालिका भवनामध्ये टाकून “मनसे’ स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
– राजू सावळे, उपाध्यक्ष, मनसे पर्यावरण विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)