नोव्हाक जोकोविच तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन विजेता

अमेरिकेचा महान खेळाडू पीट सॅम्प्रसच्या 14 ग्रॅंड स्लॅम मुकुटांची बरोबरी

न्यूयॉर्क: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या युआन मार्टिन डेल पोट्रोवर सरळ सेटमध्ये मात करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. जोकोविचने अमेरिकन ओपन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली आहे. त्याने याआधी 2011 व 2015 मध्ये हा मान मिळविला होता.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचने डेल पोट्रोविरुद्ध 6-3, 7-6 (7/4), 6-3 अशा फरकाने बाजी मारताना तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. तसेच या जेतेपदाबरोबर त्याने पीट सॅम्प्रास यांच्या 14 ग्रॅंड स्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. जोकोविचचे हे यंदाच्या हंगामामधील सलग दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले असून त्याने याआधी विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. त्याअगोदर तब्बल 54 आठवडे त्याला ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. तसेच गेल्या वर्षी त्याला अमेरिकन ओपनमध्ये सहभागही घेता आला नव्हता.

अंतिम सामन्यात जोकोविचने आक्रमक खेळ करीत पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये डेल पोट्रोने त्याला जबरदस्त झुंज दिली. त्यामुळे दुसरा सेट जिंकण्यासाठी जोकोविचला संघर्ष करावा लागला. टायब्रेकरपर्यंत गेलेला हा सेट िंकून जोकोविचने 2-0 अशी आघाडी घेतली, तेव्हाच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. 1949 मधील पॅन्चो गोन्साल्विहसनंतर 0-2 अशा पिछाडीवरून अंतिम सामना जिंकणारा पहिला खेळाडू बनण्याची डेल पोट्रोला संधी होती. परंतु तिसरा सेट पुन्हा एकतर्फी जिंकताना जोकोविचने विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.

तत्पूर्वी जोकोविचने उपान्त्य फेरीत जपानच्या जायंट किलर केई निशिकोरीला 6-3, 6-4, 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. तर युआन डेल पोट्रोने नदालला कडवी झुंज दिली होती. स्टार खेळाडू राफेल नदाल याला दुखापतीमुळे उपान्त्य लढतीतून माघार घ्यावी लागली होती. परंतु सामना थांबवण्यात आला तेव्हा पोट्रो 7-6 (7-3), 6-2 अशा आकडेवारीसह आघाडीवर होता. ही विजयी लय त्याला अंतिम सामन्यात मात्र राखता आली नाही आणि त्याला जोकोविचविरुद्ध सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.

त्याआधी जोकोविचने यंदाचे विम्बल्डन विजेतेपदही आपल्या नावे केले होते. त्या वेळी त्याने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव केला होता. डेल पोट्रोविरुद्ध जोकोविचचा 18 सामन्यांतील हा 15वा विजय ठरला. तसेच त्याने डेल पोट्रोविरुद्ध ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील पाचही सामने जिंकले आहेत. अमेरिकन ओपनमध्ये आठव्यांदा अंतिम फेरीत खेळणाऱ्या जोकोविचने या स्पर्धेतील तिसरे, तर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत 23व्यांदा अंतिम फेरीत खेळताना एकूण 14वे विजेतेपद पटकावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)