पुणे – शंभर रुपयांच्या नोटांच्या बदल्यात पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्यास 20 टक्के कमिशन देण्याच्या बहाण्याने दोघांची 5 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत रवींद्र गुप्ता (41, रा. वैदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. गफार आणि अश्पाक अन्सारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 ते 25 एप्रिल या कालावधीत कोंढवा परिसरातील बेकर्स पॉइंट आणि कुबेरा गार्डन परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गफार आणि अन्सारी या दोघांनी फिर्यादींशी संपर्क साधला. शहा नावाच्या एका व्यापाऱ्याकडे 100 रुपयांच्या खूप नोटा आहेत. त्यांना त्याचे रुपांतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटात करायचे आहे.
आपण आपल्याकडील पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्यास 20 टक्के कमिशन देण्यास तो व्यापारी तयार आहे. त्यापैकी दहा टक्के आम्हाला, दहा टक्के तुम्हाला असे सांगून फिर्यादी आणि मित्रांकडून सात लाख रुपये घेतले. काही कालावधीनंतर फिर्यादींना केवळ 1 लाख 60 हजार रुपये परत देण्यात आले. उर्वरित 5 लाख 40 हजार रुपये परत न देता फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक वाडकर तपास करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा