नोटाबंदीबाबत मोदींनी माफी मागावी-कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली -नोटाबंदीबाबत रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) दिलेल्या अहवालानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील एनडीए सरकारवर चौफेर टीकेची तोफ डागली. कॉंग्रेसने तर थेट मोदींनी माफी मागावी, अशी मागणी केली.

आरबीआयच्या अहवालानंतर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी प्रतिक्रिया दिली. नोटांबदी म्हणजे आपत्ती होती. त्यात 104 निष्पाप लोकांचा जीव गेला. त्याउलट भ्रष्ट लोकांनी प्रचंड लाभ कमावला. नोटाबंदीच्या घोटाळ्यामुळे संस्थात्मक पावित्र्याला धक्का पोहचला. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या विश्‍वासार्हतेला हानी पोहचली. आता नोटाबंदीच्या आपत्तीचा देशापुढे पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे मोदींनी जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. नोटाबंदीमुळे कुठलाच हेतू साध्य झाला नाही. त्या चुकीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक अराजकता माजली. लाखों लोकांच्या नोकऱ्या गेल्या. देशातील गरीब, शेतकरी, कामगार आणि गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आता काळा पैसा कुठेय त्याचे स्पष्टीकरण मोदींनी द्यावे, असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली. चलनातून रद्द करण्यात आलेल्या बहुतांश नोटा बॅंकिंग व्यवस्थेत परतल्या. रांगांमध्ये 100 लोक मृत्युमुखी पडले. सर्वांत प्रतिकूल परिणाम गरिबांवर झाला. हे सर्व कशासाठी? नोटाबंदीने जीव गेले आणि उपजीविकेची साधनेही गेली. अर्थव्यवस्थेला झटका बसला. कामगारांनी रोजगार गमावला. या देशविरोधी कृत्याबद्दल भारत कधीच मोदी सरकारला माफ करू शकत नाही, असे ट्‌विट त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)