नोटाबंदीने लेक लाडकी योजना अडचणीत

निश्‍चित व्याजदर देण्यास बॅंकाचा नकार ; किसान विकास पत्रात करणार गुंतवणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे  : केंद्रशासनाने मागील वर्षी जाहीर केलेल्या नोटाबंदीनंतर सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. परिणामी बॅंकाचे व्याजदर मोठया प्रमाणात घटले असून त्यात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या व्याजदराचा फटका महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या लेक लाडकी या योजनेस बसला आहे. बदलत्या व्याजदरामुळे या योजनेच्या गुंतवणूकीवर 18 वर्षांसाठी निश्‍चित व्याजदर देण्यास बॅकांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे पालिकेकडून आता या योजनेची रक्कम पोस्टाच्या किसान विकास पत्रात अथवा राष्ट्रीयकृत बॅंकेत दिर्घकालीन ठेवीच्या स्वरूपात गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून येत्या मंगळवारी (दि.2) रोजी त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना पालिकेच्या वतीने 20 हजार रुपये आणि संबधित व्यक्तीने लोकसहभाग किंवा स्वतःचा 10 हजार रुपयांचा हिस्सा असे 30 हजार रुपये मुदत ठेव खात्यात गुंतविले जातात. तर एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना पालिकेच्या वतीने 40 हजार रुपये आणि स्वत:चे 10 हजार रुपये असे 50 हजार रुपये मुदत ठेव खात्यात गुंतविले जातात. पालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या वतीने 2013 मध्ये सुरु करण्यात आलेल्या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. या योजनेसाठी ठेवण्यात आलेली रक्कम गुंतवणूक करण्यासाठी पालिकेने विविध बॅंकांकडून व्याजदराची माहिती मागवली होती. या योजनेत सुमारे वर्ष गुंतवणूक केली जाणार आहे. ही मुदत अधिक काळाची असल्याने बॅंकाकडून एवढ्या मोठ्या मुदतीसाठी व्याजपत्रे देण्यास असमर्थता दाखविण्यात आली आहे. तसेच नोटाबंदी नंतर बॅंका मध्ये मोठया प्रमाणात पैसा जमा झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीयकृत बॅंकांच्या व्याजदरात मोठी घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या योजनेतंर्गत 18 वर्षानंतर आवश्‍यक ती रक्कम मिळण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून  या योजनेची रक्कम टपाल खात्याच्या किसान विकास पत्र किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेत दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक योजनेत ठेवण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)