नोटरींचे परवाना नुतनीकरण रखडले

पिंपरी – पुणे जिल्हा परिसरातील अनेक नोटरींचे परवाना नुतनीकरण रखडले आहे. त्यामुळे नोटरींना दस्त नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. तर नागरिकांनाही विविध कामासाठी नोटरींचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

विविध दस्त तयार करण्यासाठी, कागदपत्रे साक्षांकीत करण्यासाठी नागरिकांना नोटरीची गरज लागते. मात्र, त्यासाठी नोटरीचा परवाना असलेल्यांकडूनच दस्त करुन घेता येते. अन्यथा हे दस्त बेकायदा ठरु शकते. मात्र, पुणे जिल्ह्यातील सुमारे 40 नोटरींचे प्रमाणपत्र नुतनीकरण रखडले आहे. प्रमाणपत्र नुतनीकरणाअभावी नोटरींकडून दस्त करण्यास नकार दिला जातो. त्यामुळे प्रमाणपत्र नुतनीकरण झालेल्या नोटरींना शोधण्यात नागरिकांचा वेळ व पैसा खर्ची पडत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुतनीकरणासाठी नोटरींना प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडे अर्ज करावा लागतो. हजारो नोटरी प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येत असतात. त्याचबरोबर नव्याने प्रमाणपत्र घेणाऱ्यांची संख्याही मोठी असते. मात्र, कायदा मंत्रालयातील मनुष्यबळाचा अभाव, जबाबदार व्यक्तींची अधिकृत स्वाक्षरी मिळवण्यात विलंब लागतो. परिणामी, सुमारे सहा महिन्यांचा कालावधी प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी लागतो. मात्र, सहा महिने होवूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार नोटरीज्‌ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवडच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रमाणपत्राशिवाय नोटरींना नोटरी कामकाज करता येत नाही. याबाबत नुकतीच असोसिएशनची सभा संघटनेचे अध्यक्ष ऍड. पी. डी. नांगरे यांच्या अध्यक्षतेखाली मोरवाडी येथे पार पडली. त्यामध्ये रोटरी नुतनीकरण तसेच नोटरींचा भारत सरकारचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली. नोटरी प्रमाणपत्राअभावी येणाऱ्या अडचणींचा पाढा यावेळी नोटरींनी वाचला. ऍड. सुरज खाडे, ऍड. विक्रम गालफाडे, ऍड. संभाजी बवले, ऍड. विजय भोसले आदी उपस्थित होते. नोटरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. दीपक ओव्हाळ, सचिव सुर्यकांत सावंत यांनी संयोजन केले.

नोटरी प्रमाणपत्राचे नुतनीकरण वेळेत व्हावे यासाठी कायदा मंत्रालयाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, नुतनीकरणास विलंब होत असल्याने जिल्हाभरातील नोटरी हतबल झाले आहेत. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात ही समस्या आहे. परिणामी नोटरींना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असतानाच त्याचा परिणाम नागरी सेवेवर देखील होत आहे.
– ऍड. पी. डी. नांगरे, अध्यक्ष, नोटरीज्‌ असोसिएशन पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)