नोटबंदीमुळे आर्थिक अनामिकता संपली- जेटली

नवी दिल्ली- नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात पैसे बॅंकांमध्ये जमा झाल्यामुळे पैशाबाबतची अनामिकता संपुष्टात आली. त्यामुळे पैशाची जबाबदारी निश्‍चित करण्यास मदत झाली, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. नोटबंदीमध्ये बाद झालेल्या 15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी बहुते नोटा बॅंकेत जमा करण्यात आल्याचे रिझर्व बॅंकेच्या वार्षिक अहवालामध्ये जाहीर झाल्यानंतर जेटली यांनी हे मत व्यक्‍त केले आहे.

नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या बाद नोटांची उपलब्धता अपेक्षेनुसारच आहे. याचा त्रास आर्थिक व्यवहारांना 1 ते 3 तिमाहीपर्यंत जाणवला. मात्र औपचारिक आणि अनौपचारिक अर्थकारणाच्या एकीकरणामुळे मिळणारा लाभ मध्यम ते दीर्घ काळापर्यंत वाढतच जाणार आहे, असेही जेटली म्हणाले.

नोटबंदीनंतरच्या काळात बाद नोटा किती संख्येने जमा झाल्या याबाबतची माहिती “आरबीआय’कडून प्रथमच वार्षिक अहवालामध्ये देण्यात आली. बॅंकांमध्ये 15.28 लाख कोटी रुपये (बाद नोटांपैकी 99 टक्के) जमा झाल्याचे “आरबीआय’ने म्हटले आहे. ज्यांच्या जवळ बेहिशोबी पैसा होता, असे लोक सुमारे 5 लाख कोटी रुपये बॅंकांमध्ये जमा करू शकणार नाहीत, असे सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. नोटबंदीमुळे देशवासियांना जरी त्रास झाला तरी या बदलासाठी देश तयार होता, असे जेटली म्हणाले.

कोणाच्याही बाबतीत काळा पैसा पूर्ण झालेला नाही. असे व्यवहार करणारे लोक अजूनही आहेत. मात्र तरिही मोठी रक्कम जमा झाली आहे. केवळ छपाई खर्च वाढल्याने “आरबीआय’चा फायदा कमी झाला, असे मानणे हा संकुचितपणा झाला. जेंव्हा नोटबंदी झाली, तेंव्हा एक अनिश्‍चितता होता. जगभर असा कोणताही प्रयोग झाला नव्हता. त्यामुळे किती पैसे परत मिळतील याबाबत तर्क केले जाणे स्वाभाविक होते.

नोटबंदीच्यावेळी अर्थकारणामध्ये बाद नोटांचे प्रमाण 68 टक्के होते. बाद नोटा जमा करण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी दिला गेला होता. नंतर परिणामांना तोंड द्यायला लागेल म्हणून या मुदतीच्या काळात लोकांनी पैसे बॅंकांमध्ये जमा केले. त्यामुळे हे पैसे प्रामाणिकपणे मिळवलेले होते हे स्पष्ट झाले. मात्र जमा झालेले पैसे हे योग्य मार्गांनीच मिळवलेले होते, असे नाही. केवळ त्या पैशाबाबतची अनामिकता नाहीशी झाली. अन्यथा हे पैसे अर्थकारणामध्ये स्वैरपणे फिरत राहिले असते, असेही जेटली म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)