नोटबंदीच्या परिणामांचा नेमका अंदाज येण्यास काही महिने लागतील

-मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचे प्रतिपादन
वॉशिंग्टन  –गेल्या आर्थिक वर्षातील भारताच्या विकास दरावर नोटबंदीचा परिणाम दिसला नसला तरी या निर्णयाचा देशाच्या एकूण आर्थिक स्थितीवर नेमका काय परिणाम झाला हे तपासण्यासाठी आणखी काहीं महिने थांबावे लागेल असे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे. तथापी चलनातून 86 टक्के नोटा अचानक काढून घेण्याचे एकूण आर्थिक व्यवहारावर झालेले परिणाम आता नाहीसे झाले आहेत असेही त्यांनी नमूद केले. जुन्या नोटांच्या जागी दोन हजार आणि पाचशे रूपयांच्या पुरेशा नोटा आता बॅंकिंग व्यवस्थेत उपलब्ध झाल्या आहेत.
सन 2016-17 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 7.1 टक्के इतका नोंदवला गेला असून ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीत हा दर 7 टक्के इतका नोंदवला गेला आहे. याच कालावधीत नोटबंदीचा व्यवहारांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते, पण प्रत्यक्षात मात्र जीडीपीचा दर मात्र कमी झालेला दिसून आलेला नव्हता. तथापी त्या अवधीत नोटबंदीचा नेमका परिणाम अर्थव्यवस्थेवर नोंदवला गेला नाही. यापुढील काळात त्याचा नेमका अंदाज येऊ शकले असे सुब्रमण्यम म्हणाले. इन्फॉर्मल सेक्‍टरमध्ये नोटबंदीचा मोठा परिणाम झाला आहे पण तो मोजता येणे कठीण आहे असे ते म्हणाले. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलमेंटमध्ये ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बॅंकेच्या बैठकीसाठी सुब्रमण्यम सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)