नोटबंदीच्या निर्णयानंतर 99.3 टक्के नोटा परत आल्या

नोटा मोजण्याची कसरत अखेर संपली


15.41 लाख कोटींपैकी 15.31 लाख कोटी रूपये आले परत


रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालात आधिकृत आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने हजार आणि पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय नोटबंदीच्यावेळी जाहीर केला होता. त्या काळात बॅंकेत या नोटा जमा करून लोकांना बदलून देण्यात आल्या. पण नेमका किती पैसा परत आला याची माहिती रिझर्व्ह बॅंक किंवा सरकारकडून अद्याप दिली जात नव्हती. पण आता मात्र ही माहिती रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालात घोषित करण्यात आली असून चलनात असलेल्या 15 लाख 41 हजार कोटी रूपये मूल्याच्या नोटांपैकी 15 लाख 31 हजार कोटी रूपयांच्या नोटा परत आल्याची माहिती यात देण्यात आली आहे. परत आलेल्या या नोटांचे प्रमाण 99.3 टक्के इतके आहे.

भारतीय चलन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात काळे धन आहे, ते नष्ट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने हजार आणि पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून अचानक बाद केल्या होत्या. या निर्णयामुळे किमान तीन लाख कोटी रूपयांचे काळे धन उघडकीला येईल अशी शक्‍यता वर्तवली गेली होती. पण सरकारचा हा अंदाज साफ चुकला असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकृत अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशभरातील विविध बॅंकांमध्ये जुन्या नोटा जमा करून घेण्यात आल्या. त्या रिझर्व्ह बॅंकेकडे वर्ग करण्यात आल्या. पण देशभरातून नेमक्‍या किती नोटा जमा झाल्या याची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे असा आरोप केला गेला. या नोटा मोजण्याचे काम अद्याप सुरू आहे अशी माहिती वित्तमंत्र्यांकडून देण्यात येत होती. पण अखेर रिझर्व्ह बॅंकेने सन 2017-18 या काळातला वार्षिक अहवाल जाहीर केला, त्यात या परत आलेल्या नोटांची आकडेवारी देण्यात आली आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यावेळी हजार आणि पाचशे रूपयांच्या 15 लाख 41 हजार कोटी रूपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यापैकी 15 लाख 31 हजार कोटी रूपये परत आल्यामुळे केवळ 10 हजार 272 कोटी रूपयांच्याच नोटा परत आल्या नसल्याचे उघड झाले आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर नव्या नोटा छापण्यासाठी 13 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च आल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)