नोटबंदीचा सर्वात वाईट परिणाम अजून व्हायचा आहे-

मनमोहन सिंग यांनी भीती वर्तवली

नवी दिल्ली – नोटबंदीच्या निर्णयामुळे “जीडीपी’मध्ये घसरण होण्याची भीती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच व्यक्‍त केली आहे. नोटबंदीमुळे यापेक्षाही सर्वात वाईट परिणाम अजून होणे बाकी आहे, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले आहे. कॉंग्रेसच्यावतीने नोटबंदीच्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित “जनवेदना’ परिषदेत ते बोलत होते.
अनेक गोष्टी बदलत असल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा मनमोहन सिंग यांनी आपल्या भषणात फेटाळून लावला. नरेंद्र मोदींच्या नोटबंदीमुळे काय चुकीचे झाले आहे, त्याबाबत सर्व देशवासियांना जागे करणे आणि निषेधास तत्पर करणे आवश्‍यक आहे. ते सर्व लोकांना सांगणे हे सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, असे मनमोहन सिंग म्हणाले.
या परिषदेमध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या निर्णयाच्या प्रक्रियेवर टीका केली. 8 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोटबंदीचा हा निर्णय झाला असे, सरकारच्यावतीने सांगितले जाते. मात्र त्या दिवशी अशा कोणत्याही बैठकीची कोणतीही नोंद नाही. देशाच्या इतिहासामध्ये अशाप्रकारचा कृत्रिम थट्टेच प्रयोग कधीही झाल्याचे उदाहरण नाही. नोटबंदीमुळे रिझर्व बॅंक ऑफ इंडियाची प्रतिष्ठाच आज पणाला लागली आहे. “जीडीपी’मध्ये 1 टक्का जरी घसरण झाली तरी देशाचे 1.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. मोदींच्या निर्णयाची तुलना कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दीशी करायला हवी. हे आव्हान केवळ कॉंग्रेस पक्षच स्वीकारू शकतो, असे चिदंबरम म्हणाले.
नोटबंदीनंतरच्या 50 दिवसांच्या काळात भाजपचे भ्रष्ट नेते, काळा बाजारवाले आणि बॅंक अधिकारीच नोटा बेकायदेशीरपणे बदलताना आढळले आहे. काळा पैसेवाल्यांनी मागच्या दाराने आपले व्यवहार पूर्ण केले. तर सर्वसामान्य जनता मात्र रांगेतच थांबते आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे, असे चिदंबरम म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)