नोकरीच्या अमिषाने लुटणाऱ्याला पोलीस कोठडी

हिंजवडी पोलिसांनी केली आहे दिल्लीतून अटक

पुणे – असेंजर कंपनीत सिनिअर सिस्टीम इंजिनिअर म्हणून नोकरी लावण्याच्या अमिषाने 2 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात दिल्ली येथून एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 8 मोबाईल, 2 राऊटर, 1 हार्डडिस्क, 1 रबरी शिक्का, 7 सिमकार्ड, 4 बॅंक पासबुक, 14 चेकबुक, 13 डेबीट कार्ड, 1 वॉकी आणि रोख रक्‍कम 9 हजार 500 जप्त केली आहे. दरम्यान त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी दिला आहे.
मोहम्मद एहसान हुसेन सलमान (वय 28, रा. दिल्ली, मुळ रा. गाझियाबाद, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत क्रांतीकुमार अंजैय्य सालीकांती (वय 24, रा. हिंजवडी, मुळ रा. तेलंगना राज्य) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 9 मार्च 2018 ते 14 मे 2018 या कालावधीत घडली.
सालीकांती हे हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत कामाला असताना ई-मेल करण्यात आला. नोकरीचे अमिष दाखवून त्यांना वेळोवेळी 2 लाख 11 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. मात्र, त्यांना नोकरी लावली नाही. पैसेही परत दिले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी आणखी काही लोकांनी फिर्यादींशी संपर्क केला आहे. त्यांच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)