नोकराचा दुकानातील सव्वाचार लाखांच्या रोकडवर डल्ला

पुणे – नोकराने मालकाचा विश्‍वास घात करत दुकानातील 4 लाख 23 हजाराची रोकड चोरल्याची घटना विश्रामबाग येथे घडली आहे. दुकानमालकाने विश्‍वास ठेवून नोकराकडे दुकानाच्या चाव्या सोपविल्या होत्या. याप्रकरणी जनजी रावरिया (अलोकनगरी, कसबा पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुकानात काम करणारा कामगार नरेश बलराम डारा (सदाशिव पेठ) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रावरिया यांचे बुधवार पेठ परिसरातील तांबडी जोगेश्‍वरी मंदिराजवळ स्टेशनरी साहित्य विक्रीचे दुकान आहे. दुकानामध्ये आरोपी नरेश डारा हा कामास होता. नेहमीप्रमाणे ते स्वत: दुकान उघडणे तसेच बंद करण्याचे काम करीत असत. मात्र, 10 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास काम संपवून त्यांनी घाईगडबडीत दुकानाच्या चाव्यांचे पाऊच नरेश याच्याकडे देवून त्याला शटर लॉक करण्यास सांगितले. नरेश याला दुकानाच्या ड्रावरमध्ये रावरिया यांनी 4 लाख 23 हजारांची रक्कम ठेवल्याचे तसेच ड्रावरला कुलूप लावले नसल्याची माहिती होती. त्यामुळे त्याने शटर लावताना पाऊचमधील शटरची चावी काढून घेतली. फिर्यादी हे चाव्यांचे पाऊच घेवून घरी गेल्यानंतर नरेशने चोरलेल्या चावीने दुकानाचे शटर उघडून दुकानातील रोकड घेवून पलायन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर फिर्यादी यांना ड्रावरमध्ये ठेवलेली रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुपार होवूनही नरेश हा कामावर आला नसल्यामुळे त्यानेच दुकानात चोरी केली असल्याचा संशय बळावला. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)