नोकरदार हवा की आनंदी माणूस? 

संग्रहित छायाचित्र

शिल्पा देशपांडे 

परीक्षा, गुण, ऍडमिशन या त्रिशंकू अवस्थेत सध्या पालक-विद्यार्थी आहेत. या मिशन-ऍडमिशनमध्ये पालक एखाद्या सैनिकासारखे, मुलांच्या मार्कांचे शस्त्र घेऊन इप्सित महाविद्यालय मिळावे यासाठी लढत आहेत. एकीकडे प्रथितयश, प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये गर्दी तर शिक्षक वर्ग चांगला असूनही नवीन महाविद्यालयांमध्ये काही तुकड्या विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहेत. महाविद्यालय निवडताना नक्की काय निवडायचे, हे पालकांनी ठरवले पाहिजे. 

सध्या सगळीकडे मिशन ऍडमिशन असे चित्र आहे दहावी-बारावीचा नुकताच निकाल लागल्याने पुढील शिक्षणासाठी पालक आणि विद्यार्थी यांची मानसिक कसरत चालू आहे महाविद्यलाय निवडताना, शाखा निवडताना विद्यार्थांचा कल, क्षमता आणि घरापासून महाविद्यालयाचे असलेले अंतर या गोष्टी प्रामुख्याने तपासून घेणे अनिवार्य आहे. खोटी प्रतिष्ठा अर्थात काल्पनिक स्टेटससाठी किंवा कोणाचे तरी केवळ अनुकरण म्हणून, घरापासून लांबच्या अंतरावरच्या शाळेत प्रवेश घेणे चूक आहे. विद्यार्थ्यांचा कल, क्षमता नसताना अशा ठिकाणी प्रवेश घेणे हे योग्य नाही, असे मत बऱ्याच प्राचार्यांनी व्यक्‍त केले. तसेच विज्ञान शाखा घेऊन अभ्यास न जमल्याने बारावीला पुन्हा कला किंवा वाणिज्य शाखा विद्यार्थी घेतात; पण या प्रवासात त्यांचे मानसिक खच्चीकरण होते, आत्मविश्‍वास ढासळता. शिवाय हा बदल पालकांनाही अनपेक्षित असतो. त्यामुळे एकूणच पालक विद्यार्थी यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते
पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय अर्थात विख्यात एस. पी. कॉलेजच्या उपप्राचार्य कांचन शेंडे सांगतात की, कित्येक पालकांचा अट्टहास असतो की, पाल्याला विज्ञान शाखा मिळावी पण विद्यार्थ्यांचा कल आणि क्षमता याचा विचार करत नाहीत शिवाय शहराबाहेरील विद्यार्थी शिकायला येतात पण नवीन शहर सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक बदलाला सामोरे जाताना त्यांना तडजोड करताना पालक आणि कॉलेज यांची साथ मिळणे आवश्‍यक असते. शिवाय शहरातील पालकांनी महाविद्यालय आणि घर याचे अंतर याचा विचार करावा. अमुक एका शाखेचा किंवा कॉलेजचा हट्ट धरू नये. विद्यार्थ्यांनीही आकलनावर भर द्यावा. गुणांपेक्षा कौशल्यावर भर द्यावा. त्यावर आधारित अभ्यासक्रम निवडावा. प्रॅक्‍टिकल्स, कृती आणि कौशल्य ही बदलत्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या “थ्री-एच’ या तत्त्वांचा आग्रह धरावा. “थ्री-एच’ म्हणजे हॅन्ड्‌स, हार्ट आणि हेड! असा अभ्यास असावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षणाचा ठराविक मापदंड नसावा. मुळात शिक्षण ही प्रक्रिया सुंदर आणि सतत घडणारी आहे. पण त्याला गुणांच्या साच्यात बंदिस्त केले की गोडी जाते आणि गुणांच्या आकडेवारीतच शिक्षण बंदिस्त होऊन जाते. पुणे स्थित ग्राममंगल संस्थेची रचनावादी शिक्षण पद्धती याला अपवाद म्हणता येईल. पण पालकांनी ती स्वीकारणे अजून तरी अवघड आहे. नुकतीच 10 वी झालेली ईश्‍वरी म्हणते की, ‘परीक्षा हव्याच कशाला? परीक्षा नसत्या तर आम्ही आम्हाला आवडेल त्या विषयाचा तणावविरहित असा अभ्यास केला असता.’ हा दृष्टिकोन नव्या पिढीचा आहे.

प्रवेश प्रक्रियेचा अभ्यास केल्यास असे जाणवते की, झोननिहाय मार्गदर्शन केंद्र नेमलेली असूनही सगळी प्रक्रिया ऑन लाईनच आहे. शिवाय झोनप्रमाणे मार्गदर्शक नेमलेले असूनही दोन भागांमध्ये प्रवेश प्रक्रिया होत आहे. मार्गदर्शन केंद्र तसेच सर्व शाळेत भाग प्रथम पूर्ण करून घेण्यात येण्यात येतो. यासंदर्भात झोन क्रमांक 1चे संपर्क प्रमुख देवानंद साठे सांगतात की, रोज 100 ते 150 रोज दूरध्वनी येतात प्रत्येक पालकांच्या सर्व प्रश्‍नांना न कंटाळता उत्तरे द्यावी लागतात. कारण त्यांना वाटणारी चिंता आणि स्पर्धेचे युग याची जाणीव आहे अशा वेळी योग्य मार्गदर्शन दिलासा देणारे ठरते.
ऍडमिशनच्या घाईगर्दीत विद्यार्थ्याला आवडणारी कितीतरी कौशल्ये स्पर्धेच्या प्रवाहात वाहून जातात अशावेळी गरज असते प्रवाहाविरुद्ध वेगळा नव्या दृष्टिकोनाचा प्रवाह तयार करण्याची! मग ते कौशल्य भाषा, परकीय भाषा, संगीत, नाट्य, नृत्य चित्रकला किंवा पाककलाहीअसू शकते. उच्चविद्याविभुषित, गल्लेलठ्ठ पगार घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारे कितीतरी प्रवाहातील रोबोट ठरले असतील आणि त्यांची आवड मार्कांच्या आकडेवारीत पुसली गेली असेल. प्रवेशाच्या आणि शिक्षणाच्या गर्दीत समाजाला आपण फक्त नोकरदार देतो का एक उत्तम “आनंदी माणूस’ देतो याचे भान असणे पाल्याच्या दृष्टीने सकारात्मक जडणघडणीचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)