#नोंद : मन की बात “पुतळ्यांच्या’

डॉ. तुषार निकाळजे 

माझ्या मुलाला दररोज ट्युशनसाठी नेणे आणि ट्युशन संपल्यावर परत घरी आणणे हा माझ्या रुटीनचा भाग झाला आहे. त्याला ट्युशनसाठी सोडल्यानंतर घरी येऊन आणायला परत जाणे वेळेच्या दृष्टीने शक्‍य नसल्याने मी तेथेच थांबून त्याच्या ट्युशनच्या वेळात मी मॉर्निंग वॉक करून घेतो. आणि त्याची ट्युशन संपली, की त्याला तसाच शाळेत सोडवून घरी येतो. नंतर शांतपणे माझी तयारी करून ऑफिसला जातो. मागच्या रविवारची गोष्ट आहे. रविवारचा दिवस असल्याने त्याला नंतर शाळा नव्हती आणि मला ऑफिसही नव्ह्ते. सारा आरामशीर मामला होता. मी नेहमीप्रमाणे मुलास ट्युशनला सोडविले आणि मॉर्निंग वॉक करण्यास गेलो. मी वॉकिंग करायला जातो तो भाग अगदी पॉश आणि प्रशस्त आहे. वॉकिंग करण्याची जागा जवळजवळ 80-90 एकरांची आहे. त्यात मोठे गार्डन, स्वच्छ रस्ते, गर्द झाडी, काही घरे, बरीच कार्यालये, एक शाळा, एक कॉलेज आणि बरेच काही होते. हो आणि त्या भागात पुतळ्यांची संख्याही भरपूर आहे. गमतीने त्या भागाला बरेच जण पुतळा कॉलनीच म्हणतात. हे पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी बसविलेले आहेत. त्या पुतळ्यांमध्ये थोर समाज सेवक, शूर सैनिक, महान लेखक, शिक्षणतज्ज्ञ, खेळाडू आदींचा समावेश आहे. त्यामध्ये दोन पाश्‍चिमात्य विचारवंतांचे पुतळेदेखील आहेत. रोजच वॉकिंग करताना या पुतळ्यांकडे पाहत जायची मला सवय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या भागातील इमारती, हिरवीगार झाडे, तेथे ये-जा करणाऱ्या व्यक्‍ती यांचेकडे पाहून मला ताजेतवाने वाटते आणि यामुळे दिवस फ्रेश होतो. त्या रविवारी वॉक करताना मी सहज एका पुतळ्याकडे पाहिले, मला त्याचे डोळे पाणावलेले वाटले. पण मी तसाच पुढे चालत राहिलो. पुढे गेल्यानंतर दुसऱ्या पुतळ्याकडे पाहिले, तर त्याचे पाय लटपटत होते. काही अंतर चालल्यानंतर एका पुतळ्याच्या हातातील पुस्तकांमधील एखादे पुस्तक गळून पडल्यासारखे वाटले, एक पुतळा खुर्चीतून हलल्यासारखा वाटला. मला काही समजेना. मी थोडा गोंधळलो-भांबावलो. मला भास होतात की काय? असं मला वाटलं. बरे वाटत नसल्याने मी वॉकिंग लवकर आटोपले. अजून 20 मिनिटे शिल्लक होती, मुलाची ट्युशन सुटायला. आज मला उगाचच थकल्यासारखं वाटत होतं. मी थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका इमारतीसमोरील हिरवळीवर बसलो. शांत. बसल्या बसल्या मला गुंगी आल्यासारखे झाले. मी डोळे मिटताच एक तंद्री लागली. त्या तंद्रीत मी बसलेल्या हिरवळीकडे ते सारे पुतळे येताहेत असा मला भास झाला. त्यावेळी समोरच्या इमारतीमधील घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते. काही पुतळे आपल्या जागेवरून उठून चालत-चालत या हिरवळीवर येऊन बसले.
खरं तर पुतळ्यांची मूळ संकल्पना भारतीय नाही. भारताची वैदिक परंपरा ही निर्गुण भक्‍तीवर आधारित आहे. होमहवन आदीद्‌वारे निसर्गदेवतांची आराधना वेदकाळात केली जात होती. कालांतराने पुराणकाळात देवतांची संख्या वाढली आणि सगुण भक्‍ती प्रचलित झाली आणि 33 कोटी देव निर्माण झाले. त्यातूनच मूर्तीपूजा उदयास आली. ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाने देवीदेवता, राजे-महाराजे आणि पूजनीय तथा आदरणीय व्यक्‍तींचे भव्य पुतळे निर्माण करण्याची प्रथा त्याकाळात सुरू झाली, ती आजतागायत चालू आहे. पुतळे तयार करणे म्हणजे त्या व्यक्तींचा आदर्श, त्यांची तत्त्वे, सामाजिक जवळीक, चांगले गुण इत्यादी समाजासमोर ठेवणे होते; जेणे करून समाजास त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करता येईल.

आता मात्र तसा हेतू राहिला आहे, असे म्हणता येणार नाही. पुतळ्यांचेही राजकारण होताना दिसते. त्या दिवशी पुतळ्यांमध्ये झालेल्या चर्चेचा गोषवारा असा मांडता येईल-

समाजसुधारकांची नावे शैक्षणिक संस्थांना देण्याच्या हेतूमागे व्होट बॅंकेचे समीकरण जोडले जाते. महिला समाजसुधारकांच्या नावे महिलांना मोफत शिक्षणाची सोय तर केली जाते. अशा महिला सुशिक्षीत होतात. नोकऱ्याही करतात. परंतु नोकऱ्या मिळाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा संशोधनासाठी सवलती, आर्थिक सहाय्य मिळत नाही. मग मनुष्यबळ विकास कसा होणार अशी खंत एका समाजसुधारकाच्या पुतळ्याने व्यक्त केली.

काही समाजसुधारकांनी वेगवेगळे उत्सव सुरू केले, जनजागृती होण्यासाठी. आज तेच उत्सव म्हणजे नुसता जल्लोष, धिंगाणा, वाद्यांचे आवाज, डी.जे., विद्युत रोषणाई आणि बरेच काही बनले आहे. तेव्हा त्यांचा पुतळाही दु:खी होता. धरणांमध्ये विद्युत तयार होते. अशा विजेचा वापर शॉपिंग सेंटर, हॉटेल्स, स्टेडियम्स इत्यादी ठिकाणी केला जातो. त्यामुळे लोडशेडिंग करावे लागते. त्यात शेतकरी राजाचे पुरेशी वीज न मिळाल्याने हाल होतात. सोलर सिस्टीमच्या (सौरऊर्जा) नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात, पण तिचा पूर्ण सक्षमतेने वापर होत नाही. अशी तक्रार एका कारखानदाराच्या पुतळ्याने केली. सीमेवर शहीद झालेल्या शूर जवानाचा पुतळाही नाराज दिसला. ज्याने स्वतःच्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या त्याच्या कुटुंबीयांना सवलती मिळतात का? असा प्रश्‍न त्याने विचारला. चौदा चौदा तास अभ्यास करून पुढे आलेल्या, अर्धपोटी दिवस काढलेल्या समाजसुधारकाच्या जिद्दीचा कित्ता किती लोक गिरवतात? त्यांच्या विचारांच किती लोक आचरण करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा जयंतीनिमित्त हार, पुष्पगुच्छ यांचे त्यांच्या पुतळ्याजवळ फुलांचे ढीग लागतात. पण विचारांचे निर्माल्य होते. या समारंभांचे, हार, पुष्पगुच्छांचे आर्थिक नियोजन केल्यास कित्येक गोरगरीब, अनाथांचे जेवण, शिक्षण यासाख्या मूलभूत गरजा भागतील. असा विचार एका शिक्षण महर्षींच्या पुतळ्याने बोलून दाखवला. काही राजामहाराजांनी सर्वधर्माच्या जनतेचे जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षण केले. त्या जनतेच लुटलेल धन, जमिनी, संपदा परत मिळवून दिल्या. पण जनतेसाठी गोळा केलेल्या धनाचा स्वतःचा पुतळा उभारण्यासाठी वापर होताना पाहून तेही कष्टी होते.

स्वराज्यासाठी सर्वस्व त्याग केलेल्यांच्या पुतळ्यांना तर पाश्‍चिमात्य वस्तू, राहणीमान, खाणे-पिणे यांचे अंध अनुकरण होताना पाहून वेदना होतात. पुतळे बोलत असलेले सगळेच काही मला ऐकता आले नाही. ते अगदी हळू आवाजात कुजबुजत होते. पण जे काही कानावर पडले, ते ऐकल्यानंतर पुतळ्यांना आपले पुतळे उभारण्यापेक्षा आपले आचार आपले विचार आपले आदर्श यांचे पालन केले तर अधिक आनंद होईल असेच वाटत असल्याचे दिसले. असेच चालत राहिले तर पुतळे हटाव म्हणून आपणा पुतळ्यांनाच आंदोलन करावे लागेल असे एका क्रांतिकारकाच्या पुतळ्याने अगदी जोरात सांगितले.

या पुतळ्यांची चर्चा चालू होती. पहाटेचे चार वाजले होते. त्या हिरवळीशेजारील इमारतीच्या घड्याळात चार ठोके पडले, त्यातील एकाने सर्वांना सांगितले, “”आता पहाट झाली आहे, लोकांची वर्दळ सुरू होईल, आपापल्या जागेवर स्थानापन्न जाऊ या!” सगळे उठून आपापल्या ठिकाणी जाऊन स्थानापन्न झाले.

त्याच वेळी माझ्याही मोबाइलचा आलार्म वाजला. मी तंद्रीतून जागा झालो. मुलास ट्युशनमधून आणण्याची वेळ झाली होती. त्याला ट्युशनमधून घरी आणल्यानंतर चहा तयार केला. चहा घेता-घेता वर्तमानपत्र चाळत होतो. वर्तमानपत्रांतील मथळे पाहिले. ऊस पिकास ज्यादा पाणी मिळण्यासाठी आंदोलन, नदीच्या अपुऱ्या पुलावरचा कठडा तुटून टेंपो पाण्यात पडला-चार जखमी, दंगल होऊन बऱ्याच बसेस जाळल्या, पोलिसांवर दगडफेकीत दोन पोलीस अत्यवस्थ, सामूहिक बलात्कार, वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आणि बऱ्याच काही. माझ्या क्षणभर मनात विचार आला सकाळी माझ्या तंद्रीत झालेल्या पुतळ्यांची चर्चा ही वर्तमानपत्रात कशी? मी वॉकिंग करताना त्या एका पुतळ्याच्या डोळ्यात पाणी का आले असेल? दुसऱ्या पुतळ्याच्या हातातील पुस्तक गळून का पडल? याचा एकमेकांशी काही संबंध आहे का?
मला खरोखरच पुतळ्यांच्या “मन की बात’ ऐकू आली होती का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)