नोंद : गरज प्रशासकीय नीतिमत्तेची   

डॉ. तुषार निकाळजे 

घोटाळे, भ्रष्टाचार, गुन्हे… या बाबतच्या बातम्या ऐकायला, वाचायला, पाहायला मिळत नाहीत असा एकही दिवस जात नाही. त्याच्याच साथीला बलात्कार-सामूहिक बलात्कार आणि हत्यांसंबधींच्या बातम्यांमध्येही भयावह प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. हे सर्व पाहिले की हा आपला भारत देशच आहे का? आपली संस्कृती कोठे हरवत चालली आहे? असे प्रश्‍न अपरिहार्यपणे मनात उभे राहतात. 

एका जिल्ह्याच्या तहसीलदाराला एक कोटी रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच जिल्ह्यातील 600 नागरी सेवक व अधिकाऱ्यांना यापूर्वी लाच घेताना अटक केली व त्यांचेवर गुन्हे दाखल केले. एका वर्षापूर्वी मतदार यादीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी एका निवडणूक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला. एका पोलीस आयुक्‍तास त्याच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी एका आर्थिक घोटाळ्या प्रकरणात अटक व शिक्षा झाली होती. शाळा गणवेश, पौष्टिक अन्न, जनवारांचा चारा घोटाळा, इमारतींचा घोटाळा असे अनेकविध प्रकारचे घोटाळे आजूबाजूला घडताना दिसतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशा घोटाळ्यांमध्ये प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला गेलेला नागरी सेवक व अधिकारी वर्ग सामील असल्याने दिसून येते. त्यामुळेच याकडे गांभीर्याने पाहिले जाते. लाच, गैरप्रकार, गैरव्यवहार, घोटाळे आणि नीतीशास्त्र, एकात्मता, अभियोग्यता हे शब्द जरी विरोधाभास जाणवणारे असले तरी यांचा एकमेकांशी दृढ संबंध आहे. खालील माहितीचे अवलोकन केले असता या सर्वांचा संबंध नैतिकता-अनैतिकतेशी आहे असे निदर्शनास येईल. तसेच लोकसेवक व समाज यांच्यातील नैतिक-अनैतिक नात्याचा संबंध स्पष्टृ होईल.

शासनाच्या ध्येयधोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा नोकरवर्ग म्हणजे सनदी सेवा किंवा नागरी सेवा. या शासकीय सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शासकीय सेवक व अधिकारी (शिपाई ते सनदी अधिकारी) हे घटक करीत असतात. या लेखात वरील घटकांपैकी अधिकारी, कारकून या घटकांच्या कार्यपध्दतीचा व समाजाशी असलेल्या प्रशासकीय नात्यांचा विचार केला आहे. प्रशासकीय अधिकार वापरताना नियम, शासन निर्णय, विशेषाधिकार वापरताना नीतिशास्त्राचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. परंतु तसे बऱ्याच वेळा घडत नाही.

नीतिशास्त्र हे प्रशासकीय कामकाज करतानाही वापरणे अत्यंत आवश्‍यक आहे. कारण याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम समाजावर होत असतो. सध्याच्या प्रशासकीय सेवेच्या अथवा संघ लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा पेपर क्र. 5, सर्वसाधारण अभ्यास पेपर क्र. 4 नीतीशास्त्र, एकात्मता आणि अभियोग्यता असा विषयच अस्तित्वात आला आहे. परंतु हा विषय परीक्षेस उत्तीर्ण होण्यापुरताच वापरला जातो. सनदी/प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्‍ती झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विसर पडलेला दिसतो.

नीतिशास्त्र म्हणजे योग्य कृत्य, अयोग्य कृत्य, चांगले, वाईट, कर्तव्य, हित, कल्याण इत्यादी संकल्पना होत. नीतिशास्त्राचा उदय कोणत्या कालावधीत झाला याबाबत निश्‍चित माहिती उपलब्ध नाही; परंतु याचे श्रेय ग्रीक तत्त्वज्ञ ऍरिस्टॉटल यांना दिले जाते. त्यांनी ग्रीक मूळ शब्दाला नीतिशास्त्राचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. भारतामध्ये मेघश्‍याम पुंडलिक रेगे यांनी नीतिशास्त्राविषयी 1974 साली पुस्तक प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी न्याय, धैर्य, श्रद्धा, योग्य, अयोग्य, चांगले, वाईट, कर्तव्य, हित, कल्याण याविषयी लिहिले आहे. प्रशासकीय नीतिशास्त्राची सात तत्त्वे निःस्वार्थी वृत्ती, वस्तुनिष्ठता, मोकळेपणा, एकात्मता, उत्तरदायित्व, प्रामाणिकपणा, नेतृत्व ही आहेत. यांची अंमलबजावणी काही बोटांवर मोजण्याइतक्‍याच अधिकाऱ्यांमार्फत होते. भारतातील काही समाजसुधारक व विचारवंतांची नीतिशास्त्राविषयीची मते पुढीलप्रामणे आहेत.

लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीयतेसंबंधी नैतिक विचारांची मांडणी त्या कालावधीमध्ये केली होती. गोपाळकृष्ण गोखले यांनी देशसेवा व सार्वजनिक जीवन हाच धर्म याचे नीतिशास्त्र सांगितले. डॉ. ऍनी बेझंट यांनी राष्ट्रप्रेम, स्त्री जीवन विषयक विचार, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह याबाबतचे नीतिशास्त्र सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नैतिक चिंतन म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नैतिक विचार म्हणजे अस्पृश्‍यांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नीतिशास्त्रातील अहिंसेबद्दल “”अहिंसा याचा अर्थ भ्याडपणावर अलिप्तपणा नव्हे”. अण्णा हजारे यांच्या मते पारदर्शकता हा नीतिशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे.

हल्ली “मूल्यशिक्षण’ (व्हॅल्यू एज्युकेशन) हा विषय देखील अभ्यासक्रमात शिकविला जातो. शिक्षण-व्यक्‍ती-समाज यांच नात व भवितव्याचा अभ्यास या “मूल्यशिक्षण’ (व्हॅल्यू एज्युकेशन) विषयात शिकविला जातो. तसेच नितीशास्त्र मानवी आचरणाच्या आदर्शांचे शास्त्र आहे, नीतिशास्त्र हे मानवी चालीरीती अथवा मानवी सवयी, प्रथा यांचा विचार करणे तसेच मानवी चारित्र्याचा एक भाग आहे. यावरून व्यक्‍तीचे चारित्र्य समजते.

रोजच्या व्यवहारातही आपण नीतिशास्त्राची उदाहरणे पाहतो. ट्रॅफिक सिग्नल लाल रंगाचा असल्यास व तेथे चौकात पोलीस उभा असल्यास आपण थांबतो. परंतु या परिस्थितीत समजा पोलीस उभा नसल्यास ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन करणारे किती नैतिक? त्यातही जर एखाद्या इमानेइतबारे लाल सिग्नलला उभा असल्यास मागील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन चालक त्याला हॉर्न वाजवून, आराडाओरडा करून बाजूला सरकवून स्वतः सिग्नलचे उल्लंघन करणारे किती नैतिक? राजनीती, रणनीती, व्यवहारनीती, युद्धनीती असे नीतीचे वेगवेगळे प्रकार करता येतील.

अतिरिकी व सैनिक यांची रणनीती वेगळी वेगळी असते. अतिरेकी क्रौर्याचा अवलंब करून लोकांना मारतात. तर सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी शत्रूला मारतो. कोणी त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसाय करतो, तर लोक त्याला पैसे कमाविणारा म्हणतात. रॉकेल रेशनचे धान्य काळ्या बाजारानी विकणाऱ्यास अनैतिक समजले जाते. राजकारणी मंडळींची राजनीती वेगळीच. परिस्थिती येईल तसे निर्णय बदलायचे. फक्‍त खुर्ची किंवा सत्ता जाऊू नये आणि व्होटिंग बॅंक खात्याची शिल्लक कमी होऊ नये याची दक्षता. राजा बदलला की राज्य बदलते याची प्रचिती बऱ्याच वेळा येते. पूर्वी घेतलेल्या पक्षाच्या सरकारचा निर्णय नवीन सत्ता हाती आलेल्या पक्षाच्या निर्णयाच्या एकदम विरुद्ध.

एखाद्या व्यवस्थेचा वेगळा अनुभव. शासनाने 800 ते 900 गावे दुष्काळग्रस्त जाहीर केलेली, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, होस्टेल शुल्क, शासकीय वाहनांमध्ये प्रवास करण्यासाठी मासिक पास यामध्ये सवलत जाहीर केलेली, परंतु त्याच वेळी एखाद्या शिक्षण संस्था चालक शैक्षणिक कार्यक्रमामध्ये ड्रेस कोड बदलण्यामध्ये गुंतलेला.

परंतु इतर व्यवस्थांमधील नीतिशास्त्राचे धडे, अनुभव वेगळेच. प्रत्येक राज्याच्या शासन व्यवस्थेमध्ये जनतेपर्यंत सेवा पोहोचविणारे वेगवेगळे विभाग आहेत. उदा. पाटबंधारे, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, शिक्षण विभाग-विद्यापीठे, समाजकल्याण विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, वाहतूक विभाग इत्यादी बरेच विभाग कार्यरत असतात. या विभागांमध्ये शिपाई ते कलेक्‍टर असे बरेच सेवक व अधिकारी कार्यरत असतात.

लोकप्रशासनामधील नीतिशास्त्राचा अवलंब करताना सार्वजनिक नागरी सेवेतील मूल्ये जपणे म्हणजे तारेवरची कसरत असते. सुशासन निर्माण करायचे असल्यास उत्तम प्रशासन असणे ही देशाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जाते. स्वतःच्या कामावर श्रद्धा असल्यास कामाला वाहून घेतले जाते. अन्यथा आळशीपणा व काम टाळू वृत्तीची जोपासना होते.

व्यवस्थेत काही ध्येयवेडी माणसे असतात. त्यांना मॅन ऑन द मिशन म्हणतात. त्यांच्यामध्ये निर्भयता, धैर्य असते कोणासही न भीता अथवा दबावाखाली काम करीत नाहीत. आपला गोपनीय अहवाल खराब लिहून आपली पदोन्नती रोखली जाईल, वेतनी लाभ मिळणार नाहीत याची अजिबात भीती बाळगत नाहीत. याउलट इतर असतात. दबावाखाली, हितसंबंध तयार करून काम करतात व स्वतःचा स्वार्थ साधतात. अशा प्रवृत्ती व्यवस्था व समाज यांना घातक असतात. त्याग करण्याची प्रवृत्ती फक्‍त वैयक्‍तिक आयुष्यात असते असे नाही, सार्वजनिक काम करतानाही ती असावी लागते.

आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जवान फक्‍त पगार मिळण्यासाठी काम करीत नाहीत, तर वेळप्रसंगी प्राण पणाला लावतात. राजेशाही, हुकूमशाही, संरजामशाही यांमधील शासन व्यवस्थांपेक्षा लोकशाहीतील शासन व्यवस्था उत्कृष्ट मानली जाते. कारण ती लोकांनी लोकांसाठी चालविलेली व्यवस्था असते, व्यवस्थेत जबाबदारी व अधिकार हे शरीराचे दोन हात समजले जातात. या दोन्ही बाबी एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. जबाबदारी हे एक प्रकारे उत्तरदायीत्व किंवा पालकत्व समजले जाते हे आदर्श लोकप्रशासन व्यवस्थेच वैशिष्ट्य समजले जाते.

लोकप्रशासनातील नीतिशास्त्राचा विचार करताना आंतरराष्ट्रीय नातेसंबंधाचा देखील विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय न्यायालये, आशियाई/आंतरराष्ट्रीय मानवी हक्‍क आयोग हे याचेच प्रतीक समजले जाते. अणुयुद्ध, रासायनिक युद्ध, गुदमरणारे वायु यांच्या सारख्या गोष्टींचा शस्त्रांसारखा वापर करण्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधने आणली आहेत. याकरीता आंतरराष्ट्रीय संघटना व नैतिक घटक कार्यरत असतात. एखाद्या देशावर आलेल्या आपत्तीबाबत दुसरा देश मदत करतो. युद्धामध्ये मानवी हक्‍कांचे संरक्षण केले जाते ही आंतरराष्ट्रीय नैतिकता.

वरील सर्व मुद्यांचा अभ्यास लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा पेपर क्र.5, सामान्य अध्ययन पेपर-4 नीतीशास्त्र, एकात्मकता, अभियोग्यता या परिक्षेस अनिवार्य असलेल्या विषयांत दिला आहे. मग हा अभ्यास फक्‍त परीक्षा उत्तीर्ण होण्यापूरताच मर्यादित ठेवला जातो का? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

प्रशासनाला नितिमत्तेचे धडे देणारे एखादे स्वतंत्र विद्यापीठ अस्तित्वात येणे ही काळाची गरज आहे. परंतु सध्या सुरुवात म्हणून पदवी, पदविका यांच्या अभ्यासक्रमास वरील एखाद्या विषय अनिवार्य झाल्यास भावी पिढी व समाजास उपयोग होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)