#नोंद: ईव्हीएम विरुद्ध मतपत्रिका टीका आणि वास्तव

डॉ. तुषार निकाळजे

ईव्हीएम म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन हा एक कायम चर्चेत असलेला, किंवा त्याहून स्पष्ट शब्दात सांगायचे तर वादात असलेला विषय आहे. क्रिकेटमध्ये हारणाऱ्या टीमने अंपायरवर किंवा पिचवर टीका करावी तसा काहीसा हा प्रकार आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. मोदी लाटेत विरोधी पक्षांचा अगदी धुव्वा उडाल्यानंतर ईव्हीएम मशीनवरील टीकेला प्रचंड जोर चढला होता.

आपच्या दिल्लीतील त्सुनामीसदृश विजयानंर, किंवा पंजाबसारख्या राज्यांमध्ये भाजपा हारली आणि विरोधी पक्षा विजयी होऊन सत्तेवर आले, तेव्हा मात्र ईव्हीएम मशीन कोणाच्या डोळ्यात सलली नाही. आमचा पराभव हा ईव्हीएम मशीनमुळे झाला असे हारणाऱ्या पक्षाने म्हटले नाही, किंवा सदैव ईव्हीएम मशीनवर टीका करणारांनी आमचा विजय खरा नाही, तो ईव्हीएम मशीनमुळे झाला आहे, असे म्हटले नाही.

1987 साली प्रथम मतदान यंत्राचा (ईव्हीएम) वापर भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये यशस्वीरीत्या केला गेला. 2004 मध्ये संपूर्ण भारतातील निवडणुकांत ईव्हीएम मशिनचा वापर यशस्वीरीत्या करण्यात आला. ईव्हीएम यंत्राद्वारेअत्यंत कमी काळात निवडणुका यशस्वी झाल्याबद्दल भारतीयांनीच नाही, तर परदेशवासीयांनी देखील प्रशंसा केली होती. परंतु गेल्या 5-6 वर्षांमध्ये ईव्हीएम एक टीकेचे लक्ष्य बनलेले आहे, किंवा बनवले गेले आहे. हा नाचता येईना अंगण वाकडे म्हण्ण्यासारखा तर प्रकार नाही ना?

ईव्हीएम मशीनवर टीका करताना आर्थिक, नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरण, वेळेचे नियोजन अशा गोष्टी विचारात घेणे आवश्‍यक आहेत. समान्यत: एखाद्या राज्यातील निवडणूक मतदानासाठी आवश्‍यक मतपत्रिकांची संख्या 7 लाख 82 हजार टन एवढी असते. या कागद तयार करण्याच्या प्रक्रियेचा खर्च कोट्यवधी रुपयांचा असतो. याची दुसरी बाजू मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रियेस दुप्पट वेळ लागतो. एका मतदान केंद्रामध्ये सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाच्या दिवशी मतदान यंत्राद्वारे किमान 825 व कमाल 1050 मतदारांचे मतदान होऊ शकते. परंतु मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यास जास्तीतजास्त 610 मतदान होईल.

आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रात्रौ 10 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालू ठेवावी लागेल. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपणदेखील 21व्या शतकाकडे वाटचाल करीतआहोत. परंतु मतदान पत्रिक़ांचा वापर करून कदाचित 19 व्या शतकाकडे मागे जाण्याची भीती वाटते. मतदान पत्रिकांमुळे कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांच्या मानधनाची रक्‍कम वाढते. शासनाला हे खर्च परवडणारे नाहीत.

शासकीय नोकरभरतीचे प्रमाण कमी झालेआहे. लोकसंख्येचा आकडा 134 कोटींवर जाऊन ठेपला आहे. भारतातील सध्या निवडणूकीचे काम करणाऱ्यांची संख्या 46 लाख 50 हजार आहे. मतपत्रिका सुरू झाल्यास संपूर्ण भारतामध्ये अंदाजे 9 लाख 30 हजार जादा कर्मचारी व 53 हजार अधिकारी नियुक्‍त करावे लागतील. एवढा अधिकचा खर्च परवडेल का? आणि मतपत्रिकांचा वापर होत असताना बूथ बळकाविणे, मतपेट्या पळविणे, मतदान केंद्रांवर हल्ला करण, बोगस मतदान करंणे अशा गोष्टी पूर्वी राजरोस केल्या जात होत्या.

या गोष्टी पुन्हा सुरू होणार नाहीत हे कशावरून? सत्ता मिळविण्यासाठी कोण कोणत्या स्तरावर जाईल याची शाश्‍वती नसते. त्या दृष्टीने ईव्हीएम मशीन्स ही सर्वच दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि सोयिची आहेत. आखूड शिंगी, बहुगुणी…. असे काही म्हणतात ना, ते ईव्हीएम मशीन्सना पूर्णत: लागू पडते, जर काही उणीव असली, तर ती दूर करणे अशक्‍य नाही, पण ईव्हीएमला आंधळा वा स्वार्थी विरोध उपयोगाचा नाही. आपण तांत्रिक प्रगतीद्वारे इतर देशांना मागे टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रशासकीय कामामध्ये कागदाऐवजी तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे.

कागदविरहित (पेपरलेस) कामकाजाचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. संगणक, इंटरनेट, मोबाईल, वॉटस्‌ऍप इत्यादींद्वारे माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. आर्थिक व्यवहार कॅशलेस पद्धतीने होत आहेत. काही जगद्विख्यात वृत्तपत्रांनी छपाई करण्याची (प्रिंटआवृत्ती) पद्धत बंद केली आहेत. त्यांनी डिजिटल आवृत्यांचा उपक्रम सुरू केला आहे. मतपत्रिकांना लागणारा कागद हा झाडांपासून तयार होतो. हा कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करावी लागते. यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो.

आज शहरांमध्ये वृक्षतोड होऊन सिमेंटची जंगले तयार झाली आहेत. प्रदूषणाने कहर केला आहे. वेगवेगळे रोग, आजार निर्माण झाले आहेत. ऑक्‍सिजन पार्लर्सची आवश्‍यकता निर्माण होत आहे. जर वृक्षतोड करून कागदनिर्मिती होऊन मतपत्रिका तयार झाल्यास एखादा विरोधक हरित न्यायालयात याचिका दाखल करेल आणि त्याचेदेखील राजकारण करतील.

ईव्हीएम मशिन्सऐवजी मतपत्रिकांची मागणी करणारांनी वरील सर्व बाबींचा प्रामाणिकपणे विचार करणे अत्यावश्‍यक आहे.
पण आपण इतका प्रामाणिकपणा दाखवू शकणार आहोत का? हाच कळीचा मुद्दा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)