नेहरूनगरमध्ये किराणा व्यापाऱ्याला धमकावले

पिंपरी – पोलीस असल्याची बतावणी करुन आठ ते दहा गुंडांनी किराणा व्यापाऱ्याला मध्यरात्री शिवीगाळ करत दुकान खाली करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 20) रात्री बाराच्या सुमारास नेहरूनगरमधील वसंतदादा पाटील शाळेशेजारील साबळे निवास येथे घडली. या घटनेमुळे नेहरुनगरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी प्रकाश चौधरी (वय-30, रा नेहरुनगर) या किराणा व्यापाऱ्याने संत तुकारामनगर पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय पवार आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगरमधील वसंतदादा पाटील शाळेशेजारील साबळे निवास येथे प्रकाश चौधरी यांचे किराणा मालाचे दुकान आहे. ते तेथेच राहायला आहेत. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास गुंड विजय पवार आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी बंद असलेले दुकान ठोठाविले. दुकानाचा दरवाजावर लाथा मारत ए उठ आम्ही पोलीस आहोत, बाहेर ये, असे दरडावले.

भेदरलेल्या चौधरी यांनी दुकान उघडताच आरोपी विजय पवार याने त्यांना शिवीगाळ करत दुकान खाली करण्यास सांगितले. दुकान रिकामे केले नाही तर, किराणा माल रस्त्यावर फेकण्याची धमकी दिली. यानंतर या टोळक्‍याने चाळीतील कुलूपबंद घरात घुसण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड, शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवली. विजय पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची नेहरुनगर परिसरात दहशत आहे. अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)