नेवासेत शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

चांदा – नेवासा तालुक्‍यातील शेतकरी व शेतकरी श्रमिकांचे 14 ऑगस्ट रोजी तालुकाव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यासंदर्भात विचार विनिमय बैठक चांदा येथील गणेश सेवा संस्थेच्या सभागृहात नुकतीच पार पडली.

बैठकीत सरकारच्या फसव्या कर्जमाफी योजनेचा निषेध करण्यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफी कोणताही भेदभाव न करता द्यावी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशा मागण्या करण्यात आल्या.

पतसंस्था, नागरी बॅंका, खासगी सावकारी यांच्याकडील कर्जे माफ करावीत,अण्णा भाऊ साठे व इतर महामंडळकडील थकीत कर्जे माफ करावी, 30 जून 2016 रोजी व त्यापूर्वी पुनर्गठन केलेल्या कर्जाचा समावेश कर्जमाफीत करावा या मागण्यांचा आंदोलनात समावेश करण्यात आला आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात सरकारने काहीही टाकलेले नाही. त्यांनादेखील या कर्जफेडीचा लाभ मिळालाच पाहिजे. गायी, म्हशीच्या दुधाला भाव वाढवून मिळालाच पाहिजे, सामूदायिक व सहकारी लिफ्ट योजनेतील वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, या व अशा मागण्यासंदर्भात नेवासा तालुक्‍यातील शेतकरी व श्रमिकांचे तालुकाव्यापी चक्काजाम आंदोलना संदर्भात चांदा येथील शेतकऱ्यांच्या सहभागाचे नियोजन करण्यात आले.

नगर-औरंगाबाद महामार्गावर 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता वडाळा बहिरोबा येथे रास्तारोको करण्यात येणार आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यावेळी उपस्थित राहणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्ष, स्वभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथ दादा प्रणीत शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा,सुकाणू समिती आदी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
बैठकीस मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,कॉ.बाबा अरगडे,कॉ.बन्सी सातपुते,भाऊसाहेब मोटे, बाजार समितीचे अध्यक्ष कडूबाळ कर्डिले,दादा चिमणे,त्रिंबक भदगले यांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)