नेवासेतील 20 शाळांच्या इमारती धोकादायक

नेवासा फाटा, (वार्ताहर) – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्‍यामध्ये 20 शाळेतील 3 हजार विद्यार्थी धोकादायक वर्गांमध्ये शिक्षण घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी अक्षम्य दुर्लक्ष करीत सदरच्या खोल्या पाडण्याचा अहवाल दिलेला नाही, अशी बाब समोर आली आहे.

निंबोडीच्या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या शाळा खोल्यांचा आज आढावा घेत आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सर्वच शाळांमधील खोल्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. 2014-15 पासून तालुक्‍यातील 20 शाळांच्या 38 खोल्या पाडण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. 26 शाळांमधील 52 खोल्यांच्या दुरुस्ती प्रस्तावाकडेदेखील त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

जिल्हा परिषद शाळेत 54 हजार 708 विद्यार्थी शिक्षण घेतात. तालुक्‍यात 253 शाळा आहेत. एकूण खोल्या 1 हजार 57 असून त्यात सिमेंटच्या 477 आणि दगडी बांधकाम 580 खोल्यांचे आहे. त्यापैकी 20 शाळांच्या 38 खोल्या धोकादायक असल्याने पाडणे गरजेचे आहे, तर 26 शाळांतील 52 खोल्या दुरुस्ती करण्याची गरज आहे. या सर्व दुरुस्ती व पाडण्याचे प्रस्ताव 2014 पासूनच दिलेले आहेत. तर मोरेचिंचोरे, रस्तापूर, जायगुडे वस्ती शाळेतील 5 खोल्या पाडण्याचे प्रस्तावच अद्यापि शिक्षण विभागाकडून दाखल नाहीत. याशिवाय तालुक्‍यामध्ये 14 शाळांसाठी 29 नवीन खोल्यांची आवश्‍यकता असल्याचीही माहिती पुढे आली आहे आणि त्यात 6 शाळांमधील 12 वर्ग हे अशा पर्यायी जागेत बसवले जातात की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना जाब विचारला व त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)