नेवाशातील नगरसेवक-ग्रामस्थ बसले उपोषणाला 

नेवासा फाटा, (प्रतिनिधी) – पाहुण्या ठेकेदाराला वाचविण्यासाठी आमदार मुरकुटे हे नेवासा शहरातील ग्रामस्थांना गढूळ पाणी पाजत आहेत. या ठेकेदाराविरोधात अनेकदा लेखी तक्रार करूनही प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याची तक्रार उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी उपोषणाला बसताना केली. क्रांतिकारी पक्षाचे नगरसेवक व ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर बसले आहेत.

दोन महिन्यांपासून नेवासा शहरातील ग्रामस्थांना पिण्यासाठी गढूळ पाणी मिळत आहे. गोरगरीब जनता पाणी उकळून तसेच तुरटी टाकून पीत आहे. या पाणी योजनेच्या ठेकेदाराबाबत पदाधिकाऱ्यांनी अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे सांगून पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

खडका, दिघी, मुकुंदपूर, घोगरगाव, बेळपिंपळगाव, कुकाणा, भेंडा, सलबतपूरसह नेवासा तालुक्‍यातील विविध गावांतील ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. नेवासा वकील संघ, नेवासा युवा सेना, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, कम्युनिस्ट पक्षासह विविध सामाजिक संघटनेतील पदाधिकारी यांनीही पाठिंबा दिला. पाचेगाव येथील महिला दारुबंदीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन आल्या होत्या. त्याही या उपोषणात सहभागी झाल्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल ताके म्हणाले की, शहरातील ग्रामस्थांना गढूळ पाणी पाजण्याचे मोठे पाप होत आहे. काही लोकांच्या डोक्‍यात सत्तेची नशा गेली आहे. त्यांना या प्रश्‍नांची काळजी नसून फक्‍त नवीन बंगले, नवीन गाड्या व जमिनी घेण्यात यांना रस आहे. पाहुण्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी यासाठी मंत्र्यांची भेट घेणार आहोत. नगरसेवक सचिन वडागळे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, गढूळ पाण्याबाबत आम्ही नगराध्यक्ष यांना कल्पना दिली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी यासाठी मागणी केली. या पाणी योजनेसाठी 2 कोटी 47 लाख रुपयांचा फक्‍त देखभालीसाठी निधी आला. परंतु, हा निधी कुठे गेला? तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी व पाहुणा ठेकेदार यांचे संगनमत असून हा भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. परंतु, शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आमचा लढा चालू राहणार आहे.

गेल्या 4 महिन्यांपासून अत्यंत गढूळ पाणी नेवासेकरांना येत आहे. परंतु, प्रशासन पातळीवर कुठलीही हालचाल होत नाही व ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नसल्याने शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुठलाही अधिकारी उपोषणकर्त्याकडे फिरकला नसल्याने त्यांच्यात संतापाची भावना होती. प्रशांत गडाख, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, युवा सेनेचे निरंज नांगरे, भाऊसाहेब वाघ, पोपट जिरे यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)