नेवाशातील क्रीडासंकुलाला वेड्याबाभळींचा वेढा

मागील 14 वर्षांपासून काम रखडले : 88 लाख रुपयांचा निधी पडूनच


-गणेश घाडगे

नेवासे : राज्य सरकारच्या 1996 व 2001 च्या क्रीडा धोरणानुसार तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ग्रामीण भागातील होतकरू मुला-मुलींना क्रीडाक्षेत्रात संधी उपलब्ध व्हाव्यात, असा या धोरणाचा उद्देश. मात्र नेवाशात या क्रीडासंकुलाचे काम अर्धवट अवस्थेत असून, त्यास वेड्याबाभळींचा वेढा पडला आहे. त्यामुळे मागील 14 वर्षांपासून हे क्रीडासंकुल रखडले असून, त्यासाठी एक कोटी तीन लाखांचा निधी मिळाला होता. त्यातील फक्त 15 लाख रुपयेच खर्च झालेले आहेत. उर्वरित निधी तसाच पडून आहे. त्यामुळे क्रीडा संकुल नेवासेकरांसाठी स्वप्नच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार तालुक्‍यात तत्कालीन आमदार नरेंद्र घुले यांच्या काळात क्रीडा संकुलास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर 2002 मध्ये शहर हद्दीतील गट क्रमांक 344 मधील क्षेत्र अधिग्रहित करून 2005 पासून संकुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात देखील झाली. या क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी 25 लाखांचा निधी पहिल्या टप्प्यात मिळाला होता. 25 लाखांपैकी 15 लाख रुपयेचा निधी खर्च झाला. नंतर जागेच्या अडचणीमुळे 2006 मध्ये हे काम बंद पडले.

मागील 14 वर्षांपासून तालुक्‍यातील क्रीडापटू या क्रीडासंकुलाचे काम पूर्ण होईल, याकडे लक्ष लावून बसले आहेत. 14 वर्षांपासूनही या कामात काहीच प्रगती नाही. या कामासाठी 2010 मध्ये पुन्हा नव्याने या क्रीडा संकुलासाठी 78 लाखांचा निधी मिळाला. मात्र तो अद्यापही पडूनच आहे. अधिकारी, ठेकेदार व तालुक्‍यातील राजकीय पायओढ यामुळे हे क्रीडा संकुल वेड्याबाभळीच्या कचाट्यात सापडले आहे.

क्रीडासंकुलास 2002 साली मान्यता मिळाली. त्यासाठी शहरातील चार एकर जागा अधिग्रहित करण्यात आली. त्यानंतर या कामासाठी 25 लाख रुपये मिळाले. 2005 साली संकुलाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. त्यानंतर या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी खर्च झाला. त्यानंतरही 78 लाख रुपये निधी मंजूर झाला. मात्र अद्यापही 88 लाख रुपये पडून आहेत. क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलसाठी 13 लाख 18 हजार 167 रुपये, कबड्डी मैदानासाठी 27 हजार 930 रुपये, रनिंग ट्रॅकसाठी 5 लाख 70 हजार 44 रुपये, बास्केटबॉल मैदानासाठी 10 लाख नऊ हजार 269 रुपये, हॉलिबॉलसाठी पाच लाख 802 रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे.

“नेवासा नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांसह क्रीडामंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली असून, लवकरच हा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.
-संगीता बर्डे, नगराध्यक्ष

“नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन अनेक दिवसांपासून रखडलेल्या क्रीडा संकुलाचा प्रश्‍न नगरपंचायतीच्या माध्यमातून लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. तसेच क्रीडा प्रेमींना हे संकुल खेळण्यासाठी खुले करण्याचा प्रयत्न करू.
-नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष

“आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे. लवकरच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांना भेटून भरीव निधी या क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी करणार आहे.
-संजय सुखदान, शहराध्यक्ष, कॉंग्रेस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)