नेपाळमध्ये 2 कोटी रूपयांच्या जुन्या भारतीय नोटा जप्त

15 जणांना अटक; 3 भारतीयांचाही समावेश
काठमांडू  -नेपाळमध्ये 2 कोटी रूपयांच्या जुन्या म्हणजेच चलनातून रद्द करण्यात आलेल्या भारतीय नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी 3 भारतीयांसह 15 जणांना अटक करण्यात आली.
नेपाळच्या मोरांग जिल्ह्यातील एका घरावर स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला. या कारवाईवेळी जवळपास 1 कोटी रूपयांच्या जुन्या भारतीय नोटा ठेवण्यात आलेल्या दोन बॅगा आढळल्या. या कारवाईवेळी आणखी भारतीय नोटांबाबतची माहिती मिळाली. काठमांडू शहराच्या हद्दीलगत असणाऱ्या हॉटेलबाहेर पार्क करण्यात आलेल्या एका कारमध्ये उर्वरित जुन्या भारतीय नोटा सापडल्या. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारतीयांची नावे अंकुरकुमार आगरवाल, दिनेश आगरवाल आणि अनिलकुमार पानसळी अशी आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या जुन्या भारतीय नोटा 500 आणि 1 हजार रूपये मुल्याच्या आहेत. या कारवाईवेळी 3 कारही जप्त करण्यात आल्या. नफा कमावण्यासाठी नेपाळी रूपयांच्या बदल्यात जुन्या भारतीय नोटा बदलण्यासाठी त्यांची तस्करी करण्यात आल्याचे उघड झाले. जुन्या भारतीय नोटांच्या तस्करीमध्ये गुन्हेगारी टोळ्या गुंतल्याचा संशय आहे. याप्रकरणी नेपाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)