नेताजींच्या अस्थि भारतात आणण्याची कन्येची नव्याने मागणी

नवी दिल्ली – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थि भारतात आणाव्यात, अशी मागणी नेताजींच्या कन्या अनिता बोस फाफ यांनी सरकारकडे केली आहे. नेताजी 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमधील विमान अपघातात मरण पावले होते. सप्टेंबर 1945 नंतर नेताजींच्या अस्थि जपानमधील टोकियोतील रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. विधीवत विसर्जन करण्यासाठी आपल्या वडिलांच्या अस्थि पुन्हा भारतात आणायला हव्यात. नेताजींच्या 73 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण भारत आणि जपान सरकारला आवाहन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र भारतात परत येण्याची नेताजींची महत्वाकांक्षा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. किमान त्यांच्या अस्थिंचा स्पर्श तरी स्वतंत्र भारताच्या मातीला व्हावा. नेताजी हिंदू होते, त्यामुळे त्यांच्या अस्थि गंगा नदीत विसर्जन होण्याची त्यांची ईच्छा पूर्ण व्हायला हवी. हे अखेरचे विधी पूर्ण व्हायला हवेत, असे त्या म्हणाल्या.

टोकियोतील जपान भारत संघटनेचे प्रमुख आणि जपानचे भारतातील माजी राजदूत हिरोशी हिराबासाशी यांनीही भारत सरकारला याबाबत विनंती केली आहे. रेंकोजी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नेताजींना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नेताजींचा विमान अपघातात मृत्यू कसा झाला आणि त्यांचे अवशेष टोकियोला कसे आणण्यात आले, याबाबतचे काही महत्वाचे दस्तऐवज आशिष रे यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यावरून जपानमधील अस्थि नेताजींचेच असल्याचे सिद्ध होते, असेही अनिता बोस यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)