#नेटसॅव्ही: आता आपल्या भाषेत मिळेल इंटरनेट! 

देविदास देशपांडे 
तुम्ही संगणक उघडता; त्यात ब्राऊझर काढून आंतरजालावरील संकेतस्थळे (इंटरनेटवरील वेबसाईट) पाहायला सुरुवात करता. ब्राऊझरमध्ये संकेतस्थळाचा पत्ता टाकताना इंग्रजीत Google असे न लिहिता आपल्या देवनागरीत “गुगल’ असे टाकता आणि ते संकेतस्थळ उघडतेही! हे सगळं स्वप्नवत वाटतंय ना? परंतु आता हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. 
आता इंटरनेटवरील डोमेन नेम (संकेतस्थळाचा पत्ता) भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. देवनागरी लिपीत “गुगल’ असे टाईप करताच गुगलचे संकेतस्थळ उघडू लागेल. हेच अन्य संकेतस्थळांच्या बाबतीतही होईल! म्हणजेच लोक इंग्रजीऐवजी आपल्या भाषेतून आंतरजालाचा इत्यंभूत वापर करू शकतील. भारतात आतापर्यंत आंतरजालाचे डोमेन इंग्रजीतच असायचे – अन्‌ तेही रोमन लिपीत! मात्र हा निर्णय प्रत्यक्षात आला तर इंग्रजीत टाईप करू न शकणारी जगाची 48 टक्के लोकसंख्या आंतरजालाशी जोडली जाऊ शकेल.
दि इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईन्ड नेम्स अँड नंबर्स (“आयकॅन’) ही संस्था संपूर्ण जगातील इंटरनेट डोमेन नेम व्यवस्था सांभाळते. सध्या ही संस्था भारतीय भाषांमध्ये डोमेन नावे देण्याच्या तयारीत आहे. यात देशातील 22 अधिकृत भाषांचा समावेश आहे. “देवनागरी, बांगला, गुजराती, गुरूमुखी, कन्नड, मल्याळम, ओडिया, तमिळ व तेलुगू या लिपींमध्ये हे काम सुरू आहे. यात अन्य भारतीय भाषांही येतील. सध्या जगातील 52 टक्के नागरिक इंटरनेट वापरतात. मात्र इंटरनेटच्या वापरातील “डिजिटल दरी’ भरून काढण्याचा प्रयत्न “आयकॅन’ करत आहे. त्यामुळे इंग्रजी न येणाऱ्या लोकांनाही आंतरजालाचा वापर करता यावा, यासाठी ही सर्व तयारी चालू आहे’, असे “आयकॅन’चे भारतीय प्रमुख समीरन गुप्ता यांनी नुकतेच सांगितले आहे. सध्या संपूर्ण जगात आंतरजालाचा वापर करणाऱ्यांची संख्या 4.2 अब्ज आहे, ही संख्या वर्ष 2022 पर्यंत पाच अब्जापर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.
भारतातील भाषांमध्ये या संभाव्य डोमेन नावांसाठीचे नियम तयार करण्याचे काम एक विशेष पथक करत आहे. त्याला “निओ-ब्राह्मी जनरेशन पॅनेल’ असे नाव देण्यात आले आहे. यात भारत, बांगला देश, नेपाळ, श्रीलंका आणि सिंगापूरमधील 60 पेक्षा अधिक तंत्रज्ञ, भाषातज्ज्ञ सहभागी आहेत, या संदर्भात देवनागरी, गुजराथी, गुरूमुखी, कन्नड, ओडिया आणि तेलुगु या सहा भाषांसाठी “आयकॅन’ने नियमांचा मसुदाही जाहीर केला असून नागरिकांच्या प्रतिक्रियाही मागवल्या आहेत.
कोणत्याही संकेतस्थळाचे “डोमेन नेम’ हे त्याचे ब्रॅंडनेम असते. ते भारतीय भाषांमध्ये मिळाले, तर बहुतांश भारतीय खऱ्या अर्थाने त्यांच्याशी जोडले जातील. “डोमेन नेम’चे भारतीयकरण करण्याची प्रक्रिया साधारण सन 2005 पासून सुरू झाली होती. “आयकॅन’ या संथेची 31 वी परिषद जानेवारी 2007 मध्ये भारतात झाली होती. त्या परिषदेचा विषयच मुळी स्थानिक भाषांमध्यये टॉप लेवल डोमेन नेमना (संकेतस्थळांच्या नावात येणारे org.com) परवानगी देण्यासंदर्भात होता.
महाजालाच्या संदर्भात हा एक क्रांतिकारी विषय होता. त्याचे पर्यवसान 2014 मध्ये .भारत (डॉट भारत) हे “डोमेन नेम’ साकारण्यात झाले. अन्य भारतीय लिप्यांमध्येही अशीच डोमेन नेम उपलब्ध आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांचा वापर सरकारी पातळीपर्यंतच मर्यादित होता. आता तो किंचित पुढे सरकला असून “राजस्थान.भारत’ हे “डोमेन नेम’ गेल्या वर्षी आकाराला आले. उदयपूरला उगम पावलेली तंत्रज्ञानाची ती गंगा लोकांपर्यंत पोचेल.
या सर्व उपक्रमात मराठी तंत्रज्ञांचा आणि पुण्याचाही थेट संबंध आहे. “सी-डॅक’चे सहसंचालक आणि “ग्राफिक्‍स अँड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रीप्ट टेक्‍नोलॉजी’ (“जिस्ट’) विभागाचे प्रमुख महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील टीमने भारतीय भाषांमध्ये डोमेन नेम आणण्याचे काम केले. त्यासाठी 22 भारतीय भाषा व लिप्यांचा अभ्यास या तंत्रज्ञांनी केला होता. देवनागरी लेखनपद्धत वापरून आठ प्रादेशिक भाषांत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी सी-डॅकने संबंधित भाषांमधील नियमांच्या आधारे एक विशिष्ट भाषा विकसित केली आहे.
इंटरनेटच्या 40 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घडामोडींपैकी ही एक आहे. युनिकोडच्या प्रसारामुळे महाजालाची व्याप्ती अनेकपटींनी वाढली. मराठीतील ब्लॉग्ज आणि संकेतसस्थळांची वाढती संख्या त्याला साक्ष आहे. मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत इंटरनेट वापरू इच्छिणाऱ्या व्यक्‍तींना त्यामुळे खूपच फायदा झाला आहे. जागतिकीकरणाची ही दुसरी बाजू असून, जागतिकीकरणाला स्थानिक संदर्भांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची ही चुणूक आहे.
अर्थात हा निर्णय सहजासहजी झालेला नाही. धोरणात्मक आणि तांत्रिक अशा दोन्ही पातळ्यांवर हा मुद्दा आव्हानात्मक होता. पहिली अडचण होती भारतातील भाषा आणि लिपींच्या वैविध्याची. भारतात अधिकृत 22 भाषा आणि 11 लिप्या आहेत. काही भाषा एकाहून अधिक लिपींत लिहिल्या जातात तर देवनागरी लिपीत 54 भाषा लिहिण्यात येतात. त्यांचे सुसूत्रीकरण करणे महाकठीण आहे. यावर उपाय असा की, एका भाषेसाठी एकाच अक्षराला मान्यता देणे. उदाहरणार्थ, मराठीत “या’ आणि “ह्या’ हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. काही भाषांमध्ये काही अक्षरे (आणि शब्दही) समान आहेत. यामुळे फिशिंग साइट्‌सना (म्हणजे फसवणूक करणारी बनावट संकेतस्थळे) मोकळे रान मिळण्याची शक्‍यता आहे. उदाहरणार्थ, हिंदी आणि मराठीतील अनेक शब्द समान आहेत.
यावरचा उपाय असा होता, की महत्त्वाच्या संकेतस्थळांसाठी (उदा. सरकारी विभाग, बॅंका) काही अक्षरे राखीव ठेवणे. सी-डॅकने यासाठी सर्व भाषांच्या अक्षरांसाठी एक वेरिएंट टेबल (म्हणजे एकाच शब्दाच्या अनेक रूपांचा तक्‍ता) केले आहे. याचे उदाहरण पाहायचे झाल्यास ळपीींरसीरा हा शब्द “इन्स्टाग्राम’, “इंस्टाग्राम’, “इन्स्टाग्रॅम’ आणि “इंस्टाग्रॅम’ असा लिहिला जातो. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे काही अश्‍लील व विकृत शब्दही संकेतस्थळासाठी वापरात येण्याचा धोका आहे. त्यावर उपाय म्हणून अशा शब्दांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीतील शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
एक वर्षांपूर्वी आपल्या नागरिकांना देवनागरी हिंदीतून ई-मेल आयडी तयार करण्याची संधी देणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य बनले होते. त्यानंतर आता ही गोष्ट घडली आहे. त्यामुळेच असा दिवस दूर नाही, जेव्हा एक मराठी माणूस संपूर्ण मराठी संगणकप्रणाली चालवून, मराठीतच लिहिलेला एक विरोप (ई-मेल) दुसऱ्या मराठी माणसाला मराठी आयडी वापरून पाठवू लागेल. त्यादृष्टीने आंतरजाल हे प्रत्येक भारतीय माणसाच्या अगदी घराजवळ आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)