“नेक-टेक’: टेक्‍नॉलॉजिकल मानदुखी

डॉ. सुषमा पुरोहित 
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानामुळे नवनवीन माध्यमे तरुणांच्या हाती येत आहेत. या माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. पण आपण सारे जण मोबाईल, स्मार्ट फोन्स, टॅबलेटच्या आहारी गेलो आहोत. तरुण पिढीला तर याचे व्यसनच जडले आहे.
टेक्‍नॉलॉजिकल रेव्होल्यूशनच्या युगात बाजारात नवनवीन गॅझेट्‌स रोज येत असतात. बाजारात येणाऱ्या या गॅजेट्‌समुळे सर्वाचीच लाईफस्टाईल प्रभावित झाली आहे. लहानापासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात टॅब्लेट वा स्मार्ट फोन हे एकच खेळणे दिसते. त्यामुळे स्मार्ट फोन व टॅब्लेट कॉम्प्युटर्सचा वाढत्या वापरामुळे “नेक-टेक’ नावाचा नवा आजार लोकांना जडला आहे.

घर, कार्यालय, कोणत्याही ठिकाणी प्रत्येक जण स्मार्टफोनवर गुंग असतो. स्मार्ट फोन व टॅब्लेट कॉम्प्युटरचा अतिवापर मान व गालावर सुरुकुत्या पडण्याचे मोठे कारण आहे. सामान्यत: सुरकुत्या या पन्नाशीच्या आसपास चेहऱ्यावर व हातापायावर दिसू लागतात; पण स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे तरुणांच्या चेहऱ्यावर अल्प वयातच या सुरकुत्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: हा आजार 18-19 या वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये जास्त आढळू लागला आहे.
“नेक-टेक’ हा नवा आजार स्मार्ट फोन व लॅपटॉपवर जास्त काम करणाऱ्या व्यक्तींनाच जडतो. स्मार्ट फोनच्या स्क्रिनवर सतत झुकून काम करावे लागते किंवा मनोरंजन सुरू असते. त्यामुळे हा आजार पसरत आहे. या आजारात मानेच्या हाडांतील अंतर कमी जास्त होते, हाताची संवेदना कमी होते. हाताच्या शिरा आखडल्या जातात. मोबाईल वापरताना मानेवर 14 किलोचे वजन पडते, असे दिसून आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच स्मार्ट फोन व टॅब्लेट वापरामुळे पाठीच्या कण्याला इजा होऊ शकते. स्नायूंवर अतिभार पडला तर कधी कधी शस्त्रक्रिया करण्याची वेळही येऊ शकते. म्हणूनच स्मार्ट फोन व टॅब्लेट वापरताना मान शक्‍यतो ताठ ठेवावी, अधूनमधून डोळ्यांची व मानेची हालचाल केली तर मानेवर कमी ताण येईल. फोन वापरताना मान किती खाली जाते, याचे भान राहत नाही. म्हणूनच जाणीवपूर्वक डोळ्यांच्या रेषेतच मान ठेवावी.
मोबाईल धरणे हीसुद्धा एक कला आहे. मोबाईलच्या अति आणि सततच्या वापराने पाठीचा मणका मोडू शकतो. कारण मोबाईलवर बोलताना मान 60 डिग्री खाली जाते. यासाठी अधूनमधून मान मागे-पुढे करणे व गोलाकार फिरवणे अत्यंत आवश्‍यक आहे.

दिवसभरात एक व्यक्ती 150 वेळा गॅझेटच्या स्क्रीनवर नजर खिळवून ठेवते. याचा परिणाम मान व खांद्याच्या हाडावर होतोच. त्यामुळे या भागाच्या त्वचेमधील नैसर्गिक लवचिकता कमजोर होते. गॅझेटचा आवश्‍यकतेपेक्षा जास्त वापर केल्यास कमी वयातच मान, चेहरा व हाडांवरील त्वचा सैल पडून सुरकुत्या पडतात. गेल्या काही वर्षात गॅझेट्‌सचा वाढता वापर आपल्या शरीरातील निरनिराळ्या अवयवांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करत आहे. दीर्घ काळ एकाच प्रकारे बसून किंवा उभे राहून मोबाईल हाताळल्याने “नेक-टेक’चा त्रास होऊ शकतो.
याशिवाय सेलफोनचा जास्त वापर केल्यास विशिष्ट प्रकारचा ब्रेन टयूमर होतो. स्मार्ट फोनचा अधिक वापर केल्यास कंबर व पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

मानेच्या दुखण्यासोबत एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्यामुळे पाठदुखीसारखे आजार तरुणाईत बळावले आहेत. त्यामुळे…
1. स्मार्टफोनवर बोलताना चालत चालत बोला.
2. संगणकावर काम करताना अधूनमधून पापण्यांची उघडझाप सुरू ठेवा.
3. मानेचे व्यायाम करा,
4. अधूनमधून इतरत्र चाला.
5. हातपायांना हलका ताणही द्या.
6. बराच वेळ खाली वाकून स्मार्टफोन वापरू नका.
दिवस भरात सतत मेसेजेस चेक करणे, चॅट्‌स, वाचताना डोळ्यावरही प्रचंड ताण येत असतो. संगणकाच्या स्क्रीनप्रमाणे मोबाईल स्क्रीन हा डोळ्यासाठी चांगला नसतो. सतत एकटक स्क्रीनकडे बघताना डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल कमी होते.

त्यामुळे डोळे दुखू लागतात. डोळ्यात कोरडेपणा निर्माण होतो. स्मार्ट फोन वापरताना हाताची बोटे स्क्रीनवर फिरत असतात. त्यामुळे हाताच्या शिरावर ताण पडतो परिणामी मान व हात दुखू लागतो. संगणकावर काम करताना हात माऊसवर एकाच स्थितीत बराच वेळ राहिल्यामुळे मनगट व कोपराचे दुखणे उद्भवू शकते. स्मार्टफोन व टॅब्लेटवर सतत काम करत राहिल्यामुळे मनावर खूप ताण येतो. आज संगणक, टॅब्लेट व स्मार्ट फोनचा वापर तरुणाई टाळू शकत नाही. म्हणून अशा आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजना, व्यायाम करणे अत्यंत आवश्‍यक आहे. ही साधने वापरा पण अतिरिक्त वापर टाळा. शिवाय ती वापरताना आपल्या हालचालींकडे लक्ष द्या. गॅझेट्‌स नेहमी डोळ्यांच्या रेषेत ठेवा. मेसेजिंग करताना व ई-मेल पाहतानाही खूप खाली झुकू नये. अधूनमधून थोडा ब्रेक घ्यावा. कारण पाठीचा कणा हा शरीराचा मुख्य आधार आहे. मग त्या कण्यावरच अतिरिक्त भार पडला तर शरीराचे चक्र चालणार तरी कसे?
आज आपण वेगाने प्रगती करत आहोत. प्रगती वेगानेच व्हायला हवी; पण हा अतिवेग नक्कीच धोकादायक आहे.

सध्या “स्लो डाऊन’चा मंत्र हा अनेक देशात पसरला आहे. स्लो डाऊन म्हणजे जीवनात गरज आहे, तेवढेच काम करावे, असा स्लो डाऊन आंदोलनाचा संदेश आहे. हे आंदोलन जीवनाच्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे. या संघटनेच्या लोकांचे म्हणणे असे की, जीवनातील वेगवेगळ्या दडपणामुळे माणूस नव्या गोष्टी शिकू शकत नाही. त्यामुळे दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी कोणत्याही प्रकारचे प्लॅनिंग न करता घालवावा. त्यामुळे आपल्याला नवीन ऊर्जा प्राप्त होते.

गॅझेट्‌सच्या तरुणाई इतकी आहारी गेली आहे की, खाता जेवता, उठता-बसता मोबाईलवर असतात. महाविद्यालयात जाताना-येताना अगदी रस्त्यावरून जातानाही याचा वापर केला जातो. काही जण तर दुचाकी आणि गाडया चालवतानाही याचा वापर करतात आणि त्यामुळे अपघात होतात. त्याचबरोबर मुंबईत घडलेल्या तरुणांच्या रेल्वे अपघातालाही हे स्मार्टफोन कारणीभूत ठरले आहेत. जीवावर बेतणारा हा मोबाईल आपल्या मुलांच्या हाती देताना पालकांचा जीवही वरखाली होतो. पण मुलांचे हट्ट पाहता त्यांना तो पुरवावा लागतो. पालकांना मुलांची काळजी असते. त्यामुळे फोनवर बोलताना हेडफोन वापरू नये, कार, दुचाकी चालवताना स्मार्टफोनचा वापर करू नये. गॅझेट्‌सच्या वापरामुळे पाठ, मान आणि कण्याची दुखणी बळावतातच पण रस्ता, लोकल किंवा सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा अतिवापर तरुणांच्या जीवावर बेतू शकतो. ‘अति तिथे माती’ ही म्हण सदैव लक्षात ठेवावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)