नेकलेस पॉइंटजवळील धुराडीत उगवले झाड

भोरला येणारे पर्यटक आकर्षित

जोगवडी- भोर तालुक्‍यातील नेकलेस पॉईंटजवळ बंद अवस्थेत असलेल्या भवानी ब्रिक्‍स टाइल्स या मंगलोरी कौल कंपनीच्या धुराडित आतील बाजूस काही वर्षांपूर्वी पिंपळाचे झाड उगवले होते. आता या झाडाने रुद्रावतार घेतला असून पंधरा ते वीस फूट उंच झाले आहे; परंतु झाडाची उंची अंदाजे 90 ते 100 फूट असल्याचा भास होत असल्याने नेकलेस पॉईंटवर येणारे पर्यटक या झाडाकडे आकर्षित होत आहेत.
भोर तालुक्‍याला ऐतिहासिक वारसा लाभला असून पर्यटनासाठी निसर्गमय वातावरण आहे.

भाटघर धरण, नीरा देवघर धरण, किल्ले, भोरचा राजवाडा, अंबावडे येथील लाकडी झुलता पुल पाहण्यासाठी पर्यटक येतात. अनेक पर्यटक नेकलेस पॉईंटवर गर्दी करतात. या ठिकाणाहून नीरा नदी नेकलेसच्या आकाराने वाहताना दिसते हे दृश्‍य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नदीच्या काठी अंदाजे 200 मीटरवर भवानी ब्रिक्‍स टाइल्स ही मंगलोरी कौलाची कंपनी बंद अवस्थेत आहे. कंपनीच्या धुराडीत पिंपळाचे झाड उगवले आहे. धुराडीची उंची अंदाजे 75 फूट असून धुराडीच्यावर 15 ते 20 फूट झाड डोकावत आहे.

हे दृश्‍य आगळेवेगळे असल्याने पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. पूर्वीच्या काळी परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने भवानी ब्रिक्‍स टाइल्स या कंपनीची स्थापना केली होती. कंपनीत मंगलोरी कौलाचे उत्पादन होत होते; परंतु काही कारणास्तव कंपनी बंद करण्यात आली. कंपनीचे बांधकाम भक्कम असल्याने आजही बांधकाम सुसज्ज अवस्थेत आहे. धुराडची उंची अंदाजे 75 फूट असून पिंपळाचे झाड जमिनीवर न उगवता धुराडीच्या बांधकामात आतील बाजूने उगवले आहे. याचे बांधकाम भक्कम असल्याने झाड पेलले गेले आहे. पर्यटकांना मात्र झाड जमिनीत उगवल्याचा भास होत असून धुराडीच्यावर पंधरा ते वीस फुटावर डोकावत असल्याने पर्यटकांना आश्चर्य वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)