नॅनो तंत्रज्ञाने जीवनाचा प्रत्येक भाग व्यापला

राजगुरूनगरात वैज्ञानिक डॉ. सतीश ओगले यांचे मत : नवनवी तंत्रज्ञाने आत्मसात करण्याचे कौशल्य दाखवा

राजगुरूनगर- वेगाने विकसित होणाऱ्या नॅनो तंत्रज्ञानाने जीवनाचा प्रत्येक भाग व्यापण्यास सुरुवात केली आहे. नॅनो रोबटिक्‍स, विनाचालक कार, हवेत उडणाऱ्या तसेच विजेवर चालणाऱ्या कार, किडा-मुंगीच्या आकाराचे लहान रोबोट अशी वेगाने येऊन आदळणारी नवी तंत्रज्ञानं आपल्यासमोर येणार असून ती नुसती समजावून घेणे नाही तर ती लगेच आत्मसात करण्याचे कौशल्य प्रत्येकालाच दाखवावे लागेल असे वैज्ञानिक डॉ. सतीश ओगले यांनी सांगितले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत “नवविज्ञान व सामाजिक बदल’ या विषयावर डॉ. ओगले बोलत होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रह्मे, सह दिवाणी न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, राजमाला बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, ऍड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा ऍड. राजमाला बुट्टेपाटील, प्रबंधक कैलास पाचारणे, ग्रामस्थ आणि उपस्थित होते.
डॉ. सतीश ओगले म्हणाले की, नॅनो टेक्‍नॉलॉजीवर सध्या जगभरातून बरेचसे संशोधन सुरू असून तिचा वापर जीवशास्त्र, जैविकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, सौंदर्य प्रसाधने आणि काही इतर क्षेत्रांमध्ये होतो आहे. उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी क्षमता नॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, नॅनो रोबोटिक्‍स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आदी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी माहिती करून घेणे गरजेचे आहे. कारण या तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य अंतर्बाह्य बदललेले आहे. नॅनो तंत्रज्ञान असलेल्या एअरोजेल, ग्राफीन, कार्बन नॅनो ट्युब्ज अशा क्षेत्रात भविष्यात उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने मोठी संधी आहे. मात्र भाविष्यात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना तशी उद्योगनिर्मिती देशात निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. डी. अनुसे, पाहुण्यांचा परिचय प्रा. ज्योती वाळूंज, तर कंचन घुमटकर हिने आभार मानले.

  • निसर्गाशी नाते जोडा
    प्रचंड सामर्थ्यशाली बनण्याच्या ध्यासात आता तंत्रज्ञानाने मानवी मनात प्रवेश केलेला आहे. त्या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाने आपला ताबा घेतला आहे. त्यासाठी माणसाने अंतर्मुख होऊन निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गातील दृश्‍यानुभावाची गंमत अनुभवायला हवी. विद्यार्थ्यांनी खूप वाचन करावे. कल्पकतेला महत्त्व द्यावे. प्रत्येक गोष्टीत विज्ञान असून ते समजून घेण्याची गरज आहे, असे डॉ. ओगले यांनी स्पष्ट केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)