नूतनीकरणातून घराला नवीन लूक द्या

कोणत्याही ठिकाणाला नवीन रूप देणे हे एखादे आव्हान स्वीकारण्यासारखेच आहे. जेव्हा आपल्या घराचा प्रश्‍न निघतो, तेव्हा ते घर आणखी सजावण्यासाठी घरातील सर्वच मंडळी उत्सुक असतात. घराच्या सजावटीकडे किंवा नूतनीकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष न दिल्यास केलेल्या कामातून समाधान मिळत नाही. कारण हे काम एका दिवसाचे नाही आणि यासाठी दीर्घकालीन योजना आखूनच घराचे सौंदर्य वाढवण्याबाबत पावले उचलावी लागतात. या कृतीतून घराचा लूक बदलण्याबराबेरच त्याची किंमतही वाढण्यास हातभार लागतो. ही बाब केवळ जुन्या विटांच्या ठिकाणी नवीन विटा लावणे किंवा फर्निचरची अदलाबदल करण्यापूरती मर्यादित नाही. थोडीफार डागडुजी केली म्हणजे घराची सजावट झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. आजकाल ऑनलाइन आणि ऑफलाइनवर घराच्या नूतनीकरणासंदर्भात सल्ला देणाऱ्या अनेक कंपन्या आणि इंटरेरिअर डिझायनर आहेत. त्यांच्या सल्ल्याने जागेचा जास्तीत जास्त वापर करून घराला नवा चेहरा देऊ शकता.

जुने घर उजळून निघेल : खिशाला मोठ्या प्रमाणात झळ पोचेल एवढे खर्चिक नूतनीकरणाचे काम नसते. नूतनीकरणासाठी डिझाइन, साहित्य किंवा लूकमध्ये थोडाफार बदल करून आपण पैशात बचत करू शकतो. जर जुने घर पाडून नवीन घरांची बांधणी करायची असेल तर ती बाब वेगळी आहे. कारण त्यात वाजवीपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. रिडेव्हलपमेंटसाठी आपण बिल्डरचे इस्टिमेट मागवू शकतो आणि त्यानुसार दर्जेदार काम वाजवी दरात करणाऱ्या बिल्डरची निवड करायला हवी. बिल्डरच्या कामाचा इतिहासही जाणून घ्यायला हवा. तरच रिनोव्हेशनसाठी पुढचे पाऊल टाकावे.

नैसर्गिकता जपणे : अलीकडच्या काळात ग्रीन लिव्हिंग हा केवळ ट्रेंड नाही तर आजच्या शहरी वातावरणात आरोग्यदायी जीवनशैली प्रदान करण्यासाठी आवश्‍यक बाब बनली आहे. राहण्याच्या ठिकाणी नैसर्गिक वातावरण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात वातावरण हवेशीर ठेवण्याचे नियोजन करावे लागते. या माध्यमातून आपल्याला आरामदायी जीवन मिळते. म्हणूनच नूतनीकरण करताना घराची नैसर्गिकता जपणे महत्त्वाचे ठरते. घराला इको फ्रेंडलीचा लूक द्या आणि पाणी आणि वनराईच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. कारंजे, बागकाम, व्हर्टिकल गार्डन, बांबू डिझायनिंग यासारख्या शैलीत बदल करून आपण घराचे वातावरण अधिक पोषक करू शकता. तसेच या मदतीतून आपण वीजबिलातही मोठी कपात करू शकता.

या चुका टाळा : घराचे नूतनीकरण करताना अनेकदा निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जातो. या कारणामुळे कालांतराने अधिक खर्च करावा लागतो. तसेच नूतनीकरण करताना भिंतीचे अचूक माप न घेणे ही देखील चूक महागात पडू शकते. एक इंच देखील मागेपुढे झाल्यास नूतनीकरणात मोठ्या अडचणी येऊ शकतात. म्हणून अचूक माप घेऊन नूतनीकरण अधिकाधिक आकर्षक आणि सुबक करणे गरजेचे आहे. अन्य चुकांमध्ये प्री-प्लॅन वर्ककडे दुर्लक्ष करणे, टायटिंगकडे लक्ष न देणे, अधिक ट्रेंडी करण्याचा मोहात पडणे तसेच सर्वाधिक वापरल्या जागेकडे लक्ष न देणे याचा समावेश आहे. भिंतीसाठी चुकीच्या रंगाची निवड करणे आणि सुरक्षा व्यवस्था विसरून जाणे ही बाब देखील नुकसानकारक आहे. जर गुत्तेदाराकडून नूतनीकरणाचे काम करून घेतले जात असेल तर त्यावर लक्ष न ठेवणे, चुकीचे बजेट हाताळणे अशा चुका होऊ शकतात व त्या टाळणे गरजेचे आहे.

घराचे वाढते मूल्य : कोणत्याही घराचे नूतनीकरण हे घराची अधिक किंमत वाढण्यास हातभार लावणारे ठरू शकते. जर वडिलोपार्जित जुने घर असेल तर ते पाडून नव्याने बांधण्याचा विचार करत असाल तर भविष्यात त्याची किंमत वाढेल की नाही याचा अंदाज घ्या. भविष्यात चांगला फायदा होत असेल तर जुने घर पाडण्याचा आणि पुन्हा उभारण्याचा विचार करावा. या गोष्टीसाठी रिअल इस्टेट बाजारातील स्थितीकडे लक्ष द्यायला हवे.

– विजयालक्ष्मी साळवी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)