नीरा नदीत पाणी सोडता येणार नाही

रेडा- वीर अथवा भाटघर धरणातून नीरा नदी पात्रात पाणी सोडता येणार नाही, असा आदेश शासनाचे अव्वर सचिव वै. रा. कुरण यांनी संबंधितांना दिल्याने गेल्या सात दिवसांपासून नदीच्या कोरड्या पात्रात सुरू केलेल्या उपोषणकर्त्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याची काम शासनाने केले आहे. दरम्यान, हा निर्णय आज उपोषणस्थळी घेवून आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी पुन्हा इकडे न फिरकण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे आता नीरा नदीचे पाणी पेटणार असल्याचे स्ष्ष्ट झाले आहे.

दरम्यान, या उपोषणामुळे सहा आंदोलक शेतकऱ्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन शासनाचा निषेध ही नोंदविला असून दिवसेंनदिवस या उपोषणाला पाठिंबाही वाढत आहे. वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रकल्प अहवालात तरतूद नाही. नीरा डावा कालवा व उजवा कालव्यामधून उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तन सुरू आहे. जर नीरा नदीला पाणी सोडले, तर आवर्तन विस्कळीत होणार आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकामध्ये ठरल्याप्रमाणे नियोजित प्रकल्पधारकांना पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे त्यामुळेच वीर धरणातून पाणी नीरा नदीला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट उल्लेख पत्रात केला आहे. हे पत्र कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे, अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ यांना दिले आहे. या पत्राची प्रत निमगाव केतकी येथिल पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी राम घूटकडे व शाखा अधिकारी लक्ष्मण सुद्रीक यांनी उपोषणस्थळी कळविली व अव्वर सचिवांकडून आलेले पत्र वाचून दाखवली, त्यामुळे आंदोलक शेतकरी संतप्त झाले व त्यांनी घोषणादेत शासनाचा जाहिर निषेध नोंदवित अधिकाऱ्यांना पिटाळून लावत पुन्हा उपोषणाकडे फिरकू नका असा सज्जड दमच भरला. तर काही वेळ पाटबंधारे विभागाच्या उपस्थित चार अधिकाऱ्यांना आंदोलकांनी जागीच स्थानबद्ध करण्यासाठी निर्णय घेतला; परंतु अधिकारी वर्गाने झालेल्या निर्णय वरीष्ठस्तरातून झाला आहे असे समजून सांगितल्याने अधिकाऱ्यांची आंदोलकांच्या हातून सुटका झाली.

तर चोख पोलीस बंदोबस्त असल्याने अनुचित प्रकार घडला नाही; परंतु रोष व खदखद करीत शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला. दरम्यान, हा निर्णय सर्वत्र पसरताच काहीवेळातच हजारो शेतकरी वाऱ्याच्या वेगाने आंदोलनस्थळी दाखल झाले, त्यामुळे आगामी काळात नीरा नदीचे पाणी पेटणार आल्याचे चित्र गडद झाले आहे.

बैठकीविनाच निर्णय झाला कसा?
नीरा नदी पात्रात पाणी सोडावे या मागणीसाठी गुरुवार (दि.22) पासून निरवांगी येथील नदीच्या कोरड्या पात्रात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोसण सुरू आहे. तर शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्यासाठी बारामतीचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व जसंपादाविभागाच्या आधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. 27) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासवेत बैठक होणार होती. मात्र, शासनाचे दूत म्हणून गिरीश महाजन नवी दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या उपोषणस्थळी भेट घेण्यासाठी गेले होते. म्हणून ही बैठक आज (बुधवारी) होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक न होताच नीरा नदीत पाणी सोडणार नसल्याचा निर्णय जाहीर कसा झाला? असा सवाल संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित करीत शासनाचा जाहिर निषेध नोंदविला.

शेतकरी उपोषणावर ठाम
नीरा नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू असून देखील मायबाप सरकार शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. उलट पाणी सोडल्यावर आवर्तनावर परीणाम होईल असे पत्र शासनाने धाडले, त्यामुळे निर्णयाची प्रत मिळताच हजारो शेतकरी व्यथीत झाले. तुम्ही पहिला टप्पा यशस्वी केला; परंतु जीवाचा विचार करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर यांनी उपोषणस्थळी येवून शेतकऱ्यांना केले; परंतु आमचा जीव गेला तरी चालेल पण, आम्ही आमचे बेमुदत उपोषण सुरूच ठेऊ असे सांगत शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी ठाण मांडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)