#नीती-अनीती : आधारवारी 

-हिमांशू 

आपलं काम निर्दोष करण्यासाठी सामान्यतः चूक लक्षात येणं, ती मान्य करणं आणि मग ती सुधारणं, या तीन पायऱ्या असतात असं सांगितलं जातं. माणसं सामान्यतः दुसऱ्या पायरीपाशी अडखळतात. चूक लक्षात आलेली असते; परंतु ती मान्य करणं जड जातं. त्यामुळंच आपल्याकडे परस्परविरोधी मतं रेटून मांडणाऱ्यांच्या भांडणात बऱ्याच वेळा वास्तव लपून राहतं. कारण वास्तवात जिंकण्याऐवजी वादविवादात जिंकणं अधिक महत्त्वाचं मानलं जातं. विवाद ज्या विषयावर चाललेला असतो, त्याच्याशी संबंधित लोकांना मात्र खरं काय, हे शेवटपर्यंत कळत नाही. अशाच प्रकारे वादात जिंकण्याचा “ट्राय’ सध्या आधार कार्डाच्या बाबतीत सुरू आहे. “नैतिक हॅकर्स’ ही संकल्पना या निमित्तानं पूर्वीपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचली; पण वादाचा शेवट झालेलाच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधारची माहिती सुरक्षित आहेच, असा दावा करत स्वतःचाच आधार क्रमांक सार्वजनिक केला आणि माहिती हॅक करून दाखवा असं आव्हान दिलं. नैतिक हॅकर्सनी म्हणजेच चांगल्यासाठी (आणि उघडपणे) माहिती मिळवून दाखवणाऱ्या मंडळींनी लगोलग ही माहिती मिळवून दाखवली, तेव्हा सगळेच हादरले. शर्मा यांचा पत्ता, जन्मतारीख, फोन नंबर, पॅन नंबर आणि बॅंक खात्यांची माहितीही मिळवली.

व्यक्‍तीची गोपनीय माहिती आधारशी लिंक केल्यानंतर ती सुरक्षित आहे की नाही, हा वादाचा मुख्य मुद्दा. “ट्राय’च्या अध्यक्षांनीच छातीठोक दावा करणं आणि थोड्याच वेळात तो फोल ठरणं धक्कादायक होतंच; पण त्यानंतर “ट्राय’कडून दिलेलं स्पष्टीकरण अधिक धक्‍कादायक होतं. शर्मा हे अनेक वर्षे प्रशासकीय सेवेत आहेत आणि त्यामुळं हॅकर्सनी दावा केलेली माहिती आधीच सार्वजनिक झालेली आहे, असं हे स्पष्टीकरण होतं. म्हणजे, प्रशासकीय सेवेत असलेल्यांच्या बॅंक खात्यांची वगैरे माहिती सार्वजनिक केली जाते, असा याचा दुसरा अर्थ होतो, हे स्पष्टीकरण देणाऱ्यांना कळलं कसं नाही? दुसरा प्रश्‍न असा की, आधीपासूनच सार्वजनिक केलेली माहिती लीक करून दाखवा, या आव्हानाला काय अर्थ? प्रसिद्ध व्यक्‍तींची बरीच माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण त्यात पॅन नंबर आणि बॅंक खात्याच्या नंबरचाही समावेश असतो, हे आम्ही तरी कधी पाहिलेलं नाही. हॅकर्सनी शर्मा यांच्या खात्यावर एक रुपया जमा करून “नैतिकता’ दाखवली. रक्कम डेबिट पडली असती तर..? “”आधारशी संबंधित डेटा असुरक्षित आहे, अशी भीती ज्यांना वाटते, त्यांनी माझी माहिती लीक करून दाखवावी,” अशा भाषेत जे आव्हान देतात आणि आधार नंबर जाहीर करतात, त्यांनी नंतर अशी स्पष्टीकरणं का द्यावीत?

महत्त्वाच्या विषयांवर किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना वादविवाद झालेच पाहिजेत. परंतु “वादे वादे जायते तत्त्वबोधः’ या उक्तीनुसार अंतिमतः लोकांना सत्य समजणं हा वादामागचा हेतू असावा. शर्मा यांची काही माहिती आधीपासूनच सार्वजनिक करण्यात आली होती, तर “ही माहिती सोडून’ अशा शब्दांत आव्हान का दिलं नाही? ज्याची कोणतीही माहिती सार्वजनिक झालेली नाही, अशा सामान्य माणसाचा आधार नंबर का दिला नाही? प्रश्‍न उपस्थित होणारच आणि उत्तरंही द्यावीच लागणार! अर्थात, असली तर!!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)