नीट परीक्षेसाठी यंदाही ड्रेसकोड

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या “नीट’च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना यंदाही ड्रेसकोडचे बंधन घालण्यात आले आहे. ड्रेस कोडसह विविध इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, दागिने तसेच इतर साहित्य परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास “सीबीएसई’ने बंदी केली आहे. त्यासाठी सर्व परीक्षा केंद्र “नो टॉलरन्स झोन’ असतील, असे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) “नीट’ ही परीक्षा दि. 6 मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश पत्र मिळण्यास सुरूवात झाली आहे. या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. “सीबीएसई’ने गेल्या वर्षापासून परीक्षा केंद्रांवर प्रवेशासाठी ड्रेस कोडसह विविध नियमावली बनविली होती. त्यावेळी त्यावर टीकाही झाली. पण यंदाही ही नियमावली कायम ठेवली आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

ड्रेस कोड आणि इतर बंदी घातलेल्या वस्तूंसाठी सर्व परीक्षा केंद्र “नो टॉलरन्स झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सुचनेनुसार आवश्‍यक साहित्य असल्यासच प्रवेश केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश पत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र याशिवाय कोणत्याही वस्तू परीक्षा केंद्रात आणता येणार नाहीत. विद्यार्थ्यांना पेनही घेऊन जाता येणार नाही, तर परीक्षा केंद्रावरच पेन दिला जाईल. परीक्षा केंद्रातील प्रवेशासाठीची गर्दी टाळण्यासाठी 7.30 ते 8.30 आणि 8.30 ते 9.30 अशा दोन वेळा देण्यात आल्या असून या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे.

परीक्षेसाठी पुढील ड्रेसकोड
* फिकट रंगाचे अर्ध्या बाह्याचे कपडे घालून यावे
* स्लीपर, कमी उंचीचे सॅंडल्स घालावेत. बुट घालता येणार नाहीत.
* कपड्यांवर मोठ्या आकाराची बटन्स, बॅज किंवा दागिने असू नयेत.
* मुलींनी कपड्यांवर फुलांचे आकार, नक्षीकाम असलेले कपडे घालू नयेत.
* चालीरितीनुसार कपडे घालणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास आधी यावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)