#कथाबोध: नि:स्पृह न्यायाधीश

डॉ. न. म. जोशी

महादेव गोविंद रानडे हे प्रख्यात नि:स्पृह न्यायाधीश होते. नि:स्वार्थी समतोल न्यायदान करावं ते रानडे यांनीच, याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती.
एकदा न्या. रानडे यांच्या वडिलांचे एक स्नेही त्यांच्याकडं आले आणि म्हणाले
“तुमचे वडील माझे स्नेही आहेत. माझं तुमच्याकडं एक काम आहे.’
“कसलं काम? मी आपली काय मदत करू?’
“तुमच्या कोर्टात माझी एक केस सुरू होणार आहे त्याबद्दल बोलायचं होतं.’
या त्यांच्या उद्‌गारांवर रानडे गप्प बसले. ते काहीच बोलले नाहीत. वडिलांचे स्नेही निघून गेले. पण वडिलांना भेटले आणि म्हणाले-
“तुमच्या चिरंजिवांकडे माझं एक काम होतं. पण ते करतील असं वाटत नाही.’
“तुमच कसलं काम आहे?’
“आहे काही तरी. पण तुम्ही तुमच्या चिरंजीवांना सांगा.’
“सांगेन. पण त्याला पटलं तर तो नक्‍की करेल.’
महादेवरावांच्या वडिलांनी आपल्या चिरंजीवांना स्नेह यांचं काम करण्याबद्दल सांगितलं. पण ते काम कोणतं आहे हे नाही सांगितलं. कारण त्यांनाही ते माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवरावांनी आपल्या वडिलांची भेट घेतली. ते म्हणाले-
“पिताजी, आपल्या स्नेह्यांचीच काम करण्यास आपण सांगितलं आहे.’
“हो.’
“पण क्षमा करा पिताश्री. हे काम माझ्याने होणार नाही.’
“का बरं?’
“त्यांचे काम कोणतं समाजकार्याचं नसून वैयक्‍तिक स्वार्थाचं आहे. ते मला त्यांच्या बाजूने न्याय देण्यासाठी सुचविणार आहेत. न्यायदेवतेला हे मान्य नाही. मी या प्रकरणात अत्यंत तटस्थपणेच विचार करेन. केवळ कुणी नातेवाईक, स्नेही, परिचित या नात्यांमुळे न्याय बदलावा असं मला वाटत नाही आणि पिताश्री यापुढे कृपा करून कोणाही स्नेह्याला, नातेवाईकाला यासाठी घरी येऊ देऊ नका.’
वडील अचंबित झाले. त्यांनी पुत्राला शाबासकी दिली. ते म्हणाले-
“आजपर्यंत वडील मुलाला शिकवीत. आज मुलाने वडिलांना धडा दिलाय. पुत्रगुरु.’
कथाबोध
न्यायदानाची प्रक्रिया ही नि:स्पृहतेने झाली पाहिजे. न्यायदेवता आंधळी असते असं म्हणतात ते त्यामुळेच. वशिला, लाच, भाबडे प्रेम किंवा माया किंवा आणखी कोणतेही घटक न्याय संस्थेला बाधा आणणारे नसावेत. रामशास्त्री बाणा म्हणतात तो यासाठीच. प्रत्यक्ष राज्यकर्त्यांनाही देहान्ताची शिक्षा फर्मावणारे रामशास्त्री हे न्यायदेवाचे नि:स्पृह उपासक!

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)