निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती, कराडचा प्रितीसंगम

अमोल चव्हाण

रेवा वरदा, कृष्ण-कोयना,
भद्रा गोदावरी.
एकपणाचे भरती पाणी,
मातीच्या घागरी.
भीमथडीच्या तट्टांना या,
यमुनेचे पाणी पाजा
जय महाराष्ट्र माझा.
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा.

या महाराष्ट्र गीतातून आपली वेगळीच ओळख सांगणारा कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा आणि दक्षिणेहून येणारी कोयना. दोघी अगदी आमने-सामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातले नाही. पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवादच म्हणावा लागेल.

कराडचा प्रितीसंगम इतका सुंदर आहे की उत्तरालक्ष्मी पासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या पर्यंत सगळेच जण येथील सौंदर्याला भुलले. या संगमावर जसे उत्तरा लक्ष्मीचे मंदिर आहे. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची समाधी पण याचठिकाणी आहे. उत्तर भारतात जे स्थान गंगा-यमुनेला तेच महाराष्ट्रात कृष्ण-कोयनेला. कृष्णेचा किंवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणुस सहसा करत नाही. आपण नेहमी कृष्ण-कोयना असेच म्हणतो.

महाबळेश्‍वर हे उगमस्थान असलेल्या कृष्णा आणि कोयना या सख्या बहिणीच मानल्या जातात. पण दोघींमध्ये केवढा फरक ही निसर्गाची लिलाच म्हणावी लागेल. थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वागणारी. ही लहान मुलीसारखी डोंगर-दऱ्यांमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती लवकर पठारावर यायची. तहानलेल्या पिकांना पाणी पाजून ताजे-तवाने करण्याची. तर धाकटी बहिण कोयना म्हणजे महाखोडकर. डोंगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्रपण असेच रांगडेच. प्रतापगड, मकरंदगड आणि वासोटा. जावळीचे खोरे म्हणजे यांचे अंगण. पण धाकटी असली तरी अंगात जोर फारच. अर्ध्या महाराष्ट्राला वीज पुरवते म्हणून ती महाराष्ट्रासाठी वरदायिनीच ठरली आहे. भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी असलेल्या कृष्ण-कोयनेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. ऊस शेती समृध्द करणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना, वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा तर प्रतापगडावरच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना. पण कराडला आल्यावर दोघींचाही ऊर दाटून येतो आणि धावत येऊन दोघी एकमेकींना आलिंगन देतात. या प्रितीसंगमाच्या दोन वेगवेगळ्या छटा आहेत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात याचे शांत आणि कोमल रुप दिसत. तर पावसाळ्यात या नेहमी खवळलेल्या समुद्रासारखे रौद्ररुप घेतलेले असते. कृष्णा आणि कोयनेचा अगदी इंग्रजीतील (टी) प्रमाणे संगम होतो आणि पुढे दोघी एकमेकात विलीन होतात. आणि याच ठिकाणाला प्रीतीसंगम या नावाने ओळखले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
21 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)