निसर्गवाचनाचे सुंदर पुस्तक 

डॉ. न. म. जोशी 

महाराष्ट्रात जागोजागी अनेक शिक्षणसंस्था उभारलेल्या आहेत. मोठमोठ्या इमारती मैदाने संपन्न आहेत. नाशिक भागातील कर्मवीर काकासाहेब वाघ यांनीही त्या भागात शिक्षण संस्था उभारल्या. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब वाघ! साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि काम हाच राम असं मानून सतत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या बाळासाहेब वाघांनी त्यांच्या स्वतःच्या गावी शाळा काढली. गावाचं नाव रानवड. रानवड हे खरंच नावाप्रमाणे एकेकाळी रानवड होतं. निसर्गाचा वरदहस्त असला तरी तो विखुरलेला आणि दुर्लक्षित होता. या वाघानं आधी शाळेची साधी इमारत उभी केली. नेहमी जिल्हा परिषदेच्या शाळा असतात तशीच शाळा! कारण सुरुवातीलाच देखणी इमारत बांधायला पैसा कुठून आणणार…
इमारत उभी राहिली. पोरं शिकू लागली. पण ही साधीच इमारत परिसरानं सुंदर दिसेल, दिसली पाहिजे असा ध्यास बाळासाहेब वाघ यांनी घेतला.

आणि मग काय केलं? 
विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, काही गावकरी यांची सभा घेतली. शाळेभोवती बाग तयार करण्याची कल्पना मांडली आणि बाग म्हणजे कशी कुठलीतरी झाडं, कुठंतरी आणि कशीतरी लावली आहेत. अशी बाग नाही आखणी केली वाफे तयार केले. कोणती झाडं कुठं लावायची याची योजना केली. रोपं लावली. रोपांच्या आळ्यांतून पाणी घातले. दिशामाशी रोपं तरारली. शाळेतली पोरं आणि बागेतली रोपं दोन्हीही आनंदानं डुलत होती, वाढत होती बघताबघता त्या बागेतली रोपं मोठी झाली. बाग फुलली.

शाळेची साधीच इमारत आता सुंदर दिसू लागली. आणि एक दिवस एक महान रसिक तिथं आला. त्या रसिकाचे नाव होतं कुसुमाग्रज. कुसुमाग्रज शाळा बघायला आले होते. आवारात पाऊल टाकण्यापूर्वीच त्या सुंदर बागेनं ते मोहीत झाले. प्रत्येक झाडापाशी जाऊन ते बोलू लागले. त्यांचा कविमानाचा ताटवा या बागेतील फुलांच्या ताटव्यामुळं अधिक बहरला.कुसुमाग्रज खूप आनंदित झाले खूष झाले. जाताना त्यांनी शाळेच्या भेट पुस्तकात शेरा लिहिला.
“”निसर्गवाचनाचे सुंदर पुस्तक तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर साकारले.”
कर्मधुरंधर बाळासाहेब वाघ यांना कृतकृत्य वाटले. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आनंदले आणि आपल्या या साध्या शाळेचा त्यांना अधिक अभिमान वाटला.

कथाबोध 
विद्यामंदिराच्या इमरती निसर्गाच्या वैभवानं अधिक वैभवसंपन्न होतात. आणि तिथं शिक्षणानुकूल वातावरण तयार होतं. जागा असते सुविधा असतात पण दृष्टी नसते. म्हणून सुंदर इमारतीच्या भोवती रुक्ष फुफाटा असतो. श्रीमान बाळासाहेब वाघ यांनी निसर्गाला साद घातली आणि आपली संस्था अधिक सुंदर कशी होईल याचा मार्ग शोधला. कुसुमाग्रजही भारावून गेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)