निसर्गरम्य नारायणेश्वराचे मंदिर !!!

पावसाळा आणि हिवाळा हे पर्यटनासाठी उत्तम ऋतू म्हणून ओळखले जातात. त्यातल्या त्यात पावसाळा हा रसिक भटक्‍यांसाठी एक सुरेख पर्वणीच ठरतो. धो-धो बरसणारा पाऊस हिरवा रंग परिधान केलेले डोंगर, खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि ओढे, सृष्टीत ठासून भरलेला ताजेपणा यामुळे पावसात निसर्गाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला तुमच्या भटकंतीची ठिकाणं आवर्जुन दिसतील यात शंकाच नाही. या साऱ्या प्रकाराबरोबर प्राचीन मंदिराची भेट हा सुद्धा या दिवसात सुंदर आणि तितकाच उत्सुकता ताणून धरणारा पर्याय होऊ शकतो.

बहुतेकदा पावसाळ्यात सहकुटुंब जायचे कुठे ? हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावत असतो. अशा वेळी शहराच्या गर्दीला दूर सारून, निसर्गाच्या कुशीत एखादे प्राचीन मंदिर आपली वाट पाहत असते. त्यामुळे मुर्ती दर्शनाबरोबरच निसर्ग पर्यटनाचा दुहेरी आनंद आपल्याला घेता येवू शकतो. भक्तीभावाबरोबरच स्थापत्याचा दुहेरी योग येथे जुळून आलेला दिसतो. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आणि विविध भागात हजारो वर्षापूर्वी तत्कालीन राजसत्तांनी अनेक सुंदर मंदिराची निर्मिती केली. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्‍यात नारायणपूर या गावात शंभू महादेवाचं नारायणेश्वर नावाच प्राचीन शिवालयही याच पंक्तीत मोडत.

खरतरं नारायणपूर हे गाव दोन गोष्टींमुळे सर्वाना परिचित आहे. ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याचा लाभलेला सहवास आणि एकमुखी दत्तमंदिराचा मिळालेला भक्तीचा प्रसाद या दोन गोष्टीमुळे भक्तमंडळीचा आणि दुर्गप्रेमींचा नेहमीच राबता असतो. परंतु दुर्देवाची गोष्ट म्हणजे याच दत्तमंदिराशेजारी हजारो वर्षापूर्वी चालुक्‍य राजांच्या कालखंडात उभारलेल्या नारायणेश्वर मंदिराबाबत कोणालाही माहिती नसते. त्यामुळे निवांत वेळ काढून या मंदिरात आलो की, तुम्हाला एक अस्सल दर्जेदार कलाकृती पाहायला मिळेल यात शंका नाही. सासवड-कापुरहोळ रस्त्यावर पश्‍चिमाभिमुख असलेलं हे मंदिर चालुक्‍य कालखंडात बांधले गेल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या भोवताली छोटीशी तटबंदी असून या तटबंदीच्या दरवाजातूनच आपला या मंदिरामध्ये प्रवेश होतो. आत प्रवेश करताक्षणीच येथली शांतता आपल्याला लगेचच जाणवते. मंदिराच्या बाहेरच हनुमंताची एक सुरेख मूर्ती दिसते. या मूर्तीत हनुमानाच्या पायाखाली एका राक्षिनीला दाखविण्यात आले आहे.

मंदिराचे दगडी बांधकाम आजही शाबूत आहे. मंदिराबाहेरील नंदीमंडप मात्र कोसळलेल्या अवस्थेत असून त्याचे फक्त खांब तेवढे शाबूत दिसतात. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची ढोबळ रचना दिसते. मंदिराच्या द्वारपट्टीवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. यामध्ये एक गणेशाची प्रतिमाही कोरलेली दिसते. बहुतेक जण या पट्टीला गणेशपट्टी असेही संबोधतात.

सभामंडपात प्रवेश करताक्षणीच आपल्याला खाली दगडी जमिनीवर मधोमध एक कासव कोरलेले दिसून येते. मंदिराचा सभामंडप हा मुख्यत्त्वे चार खांबावर उभा आहे. या खांबाची रचनाही पाहण्यासारखी आहे. छताला आधार देणाऱ्या यां खांबाची रचनाही पाहण्यासारखी आहे. छताकडे या खांबाच्या टोकावर यक्ष दिसतात. आत सभामंडपामध्ये उत्तरेस आणि दक्षिणेस देखील दोन प्रवेशद्वारे दिसतात. चांगा वटेश्वर, चांगा वटेश्वराचा श्रीधर योगी व अंचालध्वज असे तीन शिलालेख वेगवेगळ्या जागेवर कोरलेले आहेत. असे म्हणतात की, चांगदेव महाराज आणि त्यांच्या शिष्यगणांनी या नारायणेश्वर मंदिरात तपश्‍चर्या केली होती. सभामंडपानंतर आपण गाभाराच्या समोर म्हणजेच अंतराळकक्षात येतो. येथे उभे राहिले की गाभाऱ्याच्या प्रवेशादारासमोर आपल्याला दोन मुर्त्या दिसातत. या दोन्ही मुर्त्या म्हणजे शंकराचे गण आहेत. यातल्या एक मूर्तीचे सुळे बाहेर आलेले आहेत तो आहे राक्षसगण आणि दुसरा देवगण. गाभाऱ्यात प्रवेश केला की, आपल्याला एक वर्तुळाकार खड्डा दिसेल. यात तीन पिंडी आहेत, त्यावर काचेचे आवरण लावलेले आहे. येथे नतमस्तक व्हायचे अन फेरी मारण्यासाठी बाहेर यायचे. मंदिराच्या बाह्यभाग हा अतिशय सुंदर असून दुमडत गेलेल्या दगडाच्या घडीसारखा वाटतो. दगडाची घडीवर घडी असलेली ही नक्षी मात्र डोळ्यांचे पारणेच फेडते.

या दगडांच्या भिंतीवरचा जुना कळस कालौघात कोसळला असून त्या ठिकाणी नवा कळस बांधलेला दिसतो. हा कळस म्हणजे आपल्या प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या दुर्लक्षाचा उत्तम नमुनाच म्हटला पाहिजे. मंदिराच्या दगडी बांधकामाला आजिबातच न शोभणारा कळस बांधून आपण अशा सुंदर ठेव्यांबाबत किती जागरूक आहोत हेच जणू दाखवून दिले आहे. खरतरं अशी उदाहरणे आपण ठिकठिकाणी पाहतच असतो. प्राचीन मंदिरे गड-किल्ल्यांच्या तटबंदी, पायऱ्या, बुरुज अशा ठिकाणी चित्रविचित्र बांधकामाची लाटच आलेली दिसते. ओबडधोबड, कुठल्याही साचेबंद कसलेली सिमेंटने गुळगुळीत केलेली अशी बांधकामे आपल्या अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन करीत असतात. हे कमी म्हणून की काय जुन्या मूर्त्यांना व शिल्पांवर, नक्षीकामांवर रंगरंगोटी करूनही आपण मोकळे झालो आहे. परंतु हे बदलण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. मंदिराच्या सौंदर्याला व नजकतेला बाधा न आणता सुशोभीकरण व संवर्धन जरूर केले पाहिजे यात कुणाचेही दुमत असणार नाही. असो, नारायणेश्वर मंदिराचा हा खेदजनक भाग सोडला तर मात्र एक सुंदर कातळी शिल्प पहिल्याचा तुम्हाला निश्‍चितच आनंद मिळेल यात शंका नाही.

– ओंकार वर्तले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)