निसराळेत 14 महिलांना अन्नातून विषबाधा

नागठाणे, सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) – निसराळे, ता. सातारा येथे सावडणे विधीच्या कार्यक्रमात अन्नातून 14 महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या महिलांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 14 महिलांपैकी 4 महिलांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रेखा घोरपडे (वय 48 निसराळे), स्वप्नाली घोलप (वय 29, निसराळे), सुप्रिया गायकवाड (वय 33), लीलावती गायकवाड (वय 60), लीलाबाई भोसले (वय 70), सुरेखा गायकवाड, अमृता गायकवाड (वय 11), तृप्ती गायकवाड (वय 25), रूपाली गायकवाड (वय 19), रेखा गायकवाड (वय 48), उज्ज्वला गायकवाड, लतिका गायकवाड, मनिषा घोरपडे (वय 55), रंजना अधिक रणदिवे (वय 30) अशी अस्वस्थ झालेल्यांची नावे आहेत. निसराळे येथील किसन गोविंद गायकवाड हे सोमवारी मयत झाले. दुखवट्याच्या जेवणानिमित्त गावातील महिलांनी शिधा घेऊन गायकवाड यांच्या घरी अंत्यविधी कार्यक्रमात सहभाग घेतला. रात्री जेवण झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून महिलांना जुलाब व उलट्यांचा त्रास सुरु झाला. दुपारपर्यंत महिलांची संख्या चौदा वर पोहोचल्याने एकच घबराहट झाली. त्यांना रूग्णवाहिका मागवून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी तीनपर्यंत पुन्हा सात महिला दाखल झाल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी तातडीने उपचाराच्या सूचना दिल्या. काही महिलांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची नावे समजली नाहीत. निसराळे गावात जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)