निष्कर्ष: नरभक्षक अवनी, अंबानी आणि बरंच काही…

नित्तेन गोखले

विरोधी पक्षांनी भाजप-सरकार “अवनी’सारख्या वाघांना व बाकी जनावरांना मारून यवतमाळ येथील जमीन रिलायन्स सिमेंटला कारखान्यासाठी देण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले. पण अनिल अंबानी यांनी रिलायन्स सिमेंट ही कंपनी ऑगस्ट 2016 दरम्यान बिर्ला कॉर्पोरेशनला विकून टाकली आहे. आता, “अवनी’च्या हत्येबाबत समित्यांचा अहवाल आल्यावर राज्यसरकार योग्य तो निर्णय घेऊन सर्व माहिती समोर आणेलच. पण राजकीय पक्ष या विषयाबाबतचे सत्य जाणून घेण्यापेक्षा, याचा स्वतःच्या राजकारणासाठी फायदा करून घेत आहेत, हे नक्कीच दिसून आले.

विदर्भातील अवनी वाघीण हत्याप्रकरणामुळे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या चर्चेचा विषय बनले होते. अवनी (टी 1) वाघिणीला 2 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या यवतमाळमधील पांढरकवडा जंगलात ठार करण्यात आले.
अवनीच्या मृत्यूवरून सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यात वाद निर्माण झाला. दोघांनी एकमेकांचे राजीनामे मागितले. वन्यप्रेमींनी, तसेच पशू अधिकार कार्यकर्त्यानी अवनीला मारण्याच्या निर्णयाचा निषेध केला व हत्या करून वन मंत्री तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप केले. प्राणिप्रेमींनी हत्येच्या निषेधार्थ देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली. हास्यास्पद बाब म्हणजे काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याबरोबर त्यांच्यावर खुनाबाबत खटला लावण्याची मागणी करत आहेत.

वनखात्याने अवनीला ठार मारण्यासाठी शिकारी नवाब शाफत अली खान यांना जबाबदारी सोपवली होती. त्यांचा मुलगा असगर अली हादेखील कारवाईत सहभागी होता व वडील महत्त्वाच्या कामासाठी बिहारला गेले असताना असगर यानेच अवनीला ठार मारले. अवनीला मारून टाकण्याऐवजी बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद का नाही केले गेले, असा प्रश्‍न अनेकांनी विचारला. असगर अली यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याने ट्रॅनक्विलाइजर गन वापरून अवनीला बेशुद्ध करायला डार्ट मारला होता. परंतु, डार्ट लागताच वाघीणीने डरकाळी मारली त्यांच्यावर हल्ला करायला तयार झाली. यामुळे, तिला मारण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता असे अली म्हणाले. अवनी वाघिणीला मारण्याची पद्धत योग्य होती का चुकीची, हे ठरवण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. त्याच बरोबर मनेका गांधी यांनीदेखील केंद्र सरकार पातळीवर समिती नेमली आहे.

काय आहे प्रोजेक्‍ट टायगर?

भारतात 16 व्या शतकापासून वाघांची शिकार केली जायची. प्राचीन चित्रे, माहिती आणि दस्तऐवज असे सुचवतात की, अफगाण, तुर्क, राजपूत तसेच मुगल बादशहा वाघांची शिकार करायचे. वाघांच्या वेगवेगळ्या भागांना ट्राफी’ समजले जायचे. मुगल बादशहा जलाल-उद-दीन मुहम्मद अकबर यांनी शाही शिकारात वाघ मारण्याची परंपरा सुरू केली. मुघलांनंतर ब्रिटिशांच्या काळात शिकारीचा खेळ अजूनच वाढला. राजे महाराजे तसेच ब्रिटिश सरकारी अधिकारी मजेसाठी व स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करायला क्रूरपणे वाघांची शिकार करू लागले. 1875 ते 1925 दरम्यान भारतात सुमारे 80,000 वाघांची शिकार झाल्याचे आकडेवारीवरून समजते. 1947 नंतरही हा धोकादायक खेळ सुरूच राहिला. वाघांच्या त्वचेपासून चटई, कपडे, पर्स, पिशव्या बनविल्या जायच्या.

वर्ष 1966 मध्ये इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर परिस्थिती वेगाने बदलली. वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा आला की इंदिरा गांधींनी केलेल्या कामाची तुलना कोणत्याही राजकारणाशी करता येणार नाही. त्यानी 1969 दरम्यान प्रथम वाघांच्या कातडीच्या निर्यातीवर बंदी आणली. नंतर 1971 साली वाघाच्या शिकारीवर बंदी आणून 1973 पासून ‘प्रोजेक्‍ट टायगर’ वर काम सुरू केले. या अंतर्गत देशात 9 व्याघ्र प्रकल्प बनवण्यात आले. प्रकल्पाच्या परिसरातील गावे खाली करण्यात आली आणि परिसरावर गस्त घालण्यासाठी अनेक गार्ड ठेवले गेले. ह्या गोष्टींमुळे वाघांची संख्या भारतात पुन्हा वाढू लागली. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या तसेच जमिनीच्या अभावामुळे वाघ आणि लोकांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, सहा वर्षीय अवनीने गेल्या साडेतीन वर्षांत यवतमाळ परिसरातील गावात शिरून 13 लोकांचा जीव घेतला होता. तिची दहशत पंढरकवाडा आणि राळेगाव भागात जास्त होती. यामुळेच, प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांनी अवनीला मारण्यासाठी ‘शूट-ऍट-साईट’ ऑर्डर जारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील यासाठी मान्यता दिली होती. मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार, कारवाई झाली ती कायद्याच्या चौकटीत झाली. तीन महिने सर्वांचा प्रयत्न वाघीणीला जिवंत पकडण्याच्या दिशेनेच सुरु होता. परंतु ती अधिकाऱ्यांवर हमला करायच्या तयारीत असल्यामुळेच तिला नाइलाजास्तव मारण्यात आले. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी वनमंत्र्यांच्या विरोधात मत मांडले असले तरी पक्षाचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र अवनीला मारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. टी-1 ने अनेक लोकांना मारले आहे. यवतमाळमधील जंगलाच्या क्षेत्रातील शेतकरी वाघाच्या भीतीमुळे जीव मुठीत घेऊन राहतात. वाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

अवनी वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी नियुक्त केलेले महाराष्ट्र राज्य वन विभागातील अधिकारी बछड्यांना त्रास न होता त्यांना पकडून अभयारण्यात किंवा राष्ट्रीय उद्यानात सोडण्याच्या विचारात आहेत. वन्य जीवन तज्ज्ञांच्या सल्ल्‌याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल असे लोकांना आश्‍वासन देण्यात आले आहे. महाराष्ट्रात जंगली जनावरे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना सुखी होती, असे म्हणले तर चुकीचे ठरेल. कारण यवतमाळ येथील जंगलाच्या जमिनी उद्योजकांना त्यांच्याच काळात देण्यात आल्या होत्या, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)