निशाणा चुकलेला “बंदुकबाज’

बॉलिवुड मध्ये असलेल्या नवीन प्रयोग करू पाहणाऱ्या दिग्दर्शकांच्या पसंतीचा अलिकडच्या काळातील अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी, मागील काही वर्षात वैविध्यपुर्ण भुमीकांमधुन नवाजुद्दीनने आपली वेगळी छाप सोडली आहे. त्याचा “बाबुमोशाय बंदुकबाज’ ही असाच काहीसा वेगळ्यावाटेने जाणारा आहे, त्याचे दिग्दर्शन कुशन नंदीने केले आहे.

‘बाबूमोशाय बंदूकबाज’ची कथा बाबू बिहारी (नवाझुद्दीन सिद्दीकी) भोवती गुंफण्यात आलेली आहे. बाबु एक कंत्राटी मारेकरी आहे. एकदम निर्भीडपणे तो पैशासाठी लोकांचा जीव घेतो गोळ्या घालून. एकदा त्याची नजर फुलवावर (बिदीता बाग) पडते, तिच्याशी बोलता यावं म्हणून तो स्वतःची चप्पल महत्प्रयासाने फाडतो व ‘टॉल नही लेकिन डार्क और हॅंडसम तो हैं’ म्हणत तिला वश करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या डायलॉगबाजी आणि तीने सांगीतलेले काम पुर्ण केल्याने फुलवा बाबूवर फिदा होते व सरळ त्याच्या सोबत जाते. दरम्यान बाबू जिला बहिण मनात असलेया राजकारणी सुमित्रा जिजीच्या (दिव्या दत्ता) नवऱ्याला मारण्याची सुपारी मिळते, जी त्याला दुसरा राजकारणी दुबेने (अनिल जॉर्ज) दिलेली असते. त्यातच दुबेने दुसऱ्या कंत्राटी मारेकऱ्याला, बांके बिहारी (जतीन गोस्वामी) जो एकलव्याप्रमाणे बाबुला गुरु मानत असतो, सुपारी दिलेली असते. दोघांची भेट होते, मिळालेल्या तीन कंत्राटापैकी दोघांना जो मारेल तोच या धंद्यात राहिल असे ते ठरवतात, पुढे नेमके काय होते हे जाणुन घेण्यासाठी हा सिनेमा थिएटरमध्येच बघायला हवा.

कुशन नंदी दिग्दर्शित या कथेत नावीन्य नाही आणि पटकथा विस्कळीत आहे. धक्कातंत्र ओढूनताणून वापरल्यासारखे वाटते. पूर्वार्ध काही नर्मविनोदी प्रसंग आणि एक-दोन गाणी असल्यामुळे पटकन निघून जातो. परंतु, मध्यंतरानंतर चित्रपट भरकटल्यासारखा वाटतो. दिग्दर्शकाला नक्की काय म्हणायचे आहे याबद्दल संभ्रम राहतो. दृश्‍य पुढेपुढे सरकतात पण त्यात एकसंघपणा जाणवत नाही. सिनेमातील संवाद कथेला आणि सिनेमातील एकंदरीत वातावरणाल साजेसे असे उत्तम आहेत पण त्याला पटकथा धोका देते.

या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. नवाजुद्दिन सिद्दीकीने उत्तम काम केले आहे, त्याला उत्तम साथ दिली आहे जतिन गोस्वामी या अभिनेत्याने. बिदीता बागने हॉटसिन्स बरोबरच अभियनसुद्धा चांगला केला आहे. दिव्या दत्ताची पॉलिटिशीयनही लक्षात राहणारी आहे. चित्रपटाचा बाज व लूक ग्रामीण आहे व उत्तमपणे कॅमेरात टिपण्यात आलेला आहे. राजकारण, गुंडागर्दी आणि सेक्‍स भोवती फिरणाऱ्या “बाबुमोशाय बंदुकबाज’ बद्दल थोडक्‍यात सांगायचे तर टिपिकल बॉलिवुड सिनेमापेक्षा हा वेगळा प्रयोग असला तरी कथेतील नाविन्याच्या अभावी आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेला आहे. कलाकारांच्या अभिनयासाठी हा सिनेमा तुम्ही पाहु शकता.

चित्रपट – बाबुमोशाय बंदुकबाज
निर्मिती -किरण श्रॉफ, कुशन नंदी अश्‍मित कुंदेर
दिग्दर्शक – कुशन नंदी
संगीत – गौरव डागणकर, अभिलाष लकरा, देबज्योती मिश्रा
कलाकार – नवाजुद्दिन सिद्दीकी, बिदिता बाग, जतिन गोस्वामी, दिव्या दत्ता, श्रद्धा दास
रेटींग – 2.5
-भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)