थकीत महागाई, वाढ, फरक व सहाव्या वेतन फरकाची मागणी
नगर – महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत महागाई वाढ फरक व सहावा वेतन फरक तातडीने मिळावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बंद केलेली पेन्शन तत्काळ चालू करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनने आज महापालिकेत 6 तास ठिय्या आंदोलन केले.
निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना घेराव घालून, सकारात्मक निर्णय होत नाही तो पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. जिल्हाधिकारी यांच्याबरोबर सायंकाळी चर्चा होऊन निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित देयके अदा करण्यासाठी कायमचा फार्मुला ठरविण्याचा व दर महिन्याला महापालिकेच्या वसुलीतून ठराविक रक्कम अदा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2016 पासूनचा महागाई फरक, सहावे वेतन आयोग फरक, सेवा उपदान, पेन्शन विक्री तसेच ऑडीट शक प्रमाणे दीड कोटीसह एकूण 5 कोटी 60 लाख रुपये थकित आहे. सन 2016 मध्ये दिवाळीमध्ये 31 लाख 74 हजार महागाई फरकाची रक्कम देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र अनेकवेळा आश्वासन देऊन देखील सदरील थकित देयके अद्याप देण्यात आलेले नाहीत.
सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात जगणे कठिण झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील प्रश्न सुटत नसल्याचे महापालिकेत आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष एन.एम. पवळे, कार्याध्यक्ष डी.यू. देशमुख, कांतीलाल वर्मा, वसंत थोरात, रफिक शेख, अब्दुल अजीज सय्यद, रंगनाथ गावडे, पुरुषोत्तम पंचार्य, पुष्पा वैराळ, सरु काते, हौसाबाई साबळे, सुशीला शेलार आंदोलनात सहभागी झाले होते.