निवीत चार दिवसांत 14 जनावरे दगावली

पाटण – चार दिवसांत 14 जनावरे दगावल्याने निवी, ता. पाटण परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दगावलेल्या जनावरांमध्ये शेळ्यांसह म्हैस व वासराचा समावेश असून विषारी पदार्थ खाण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

निवी, ता. पाटण येथील पारूबाई बाळू मस्कर यांच्या दोन शेळ्या व एक बोकड, विठ्ठल पांडुरंग साबळे यांच्या तीन शेळ्या, तानाजी रामचंद्र भाईंगडे यांची म्हैस, बयाबाई आनंदा कोळेकर यांच्या दोन शेळ्या, पांडुरंग बंडू साबळे व नामदेव हरी साबळे यांची दोन रेडके, अशोक मारुती साबळे यांचे वासरु आणि जवळच्याच मस्करवाडीतील एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्राथमिक शाळेजवळील जुनीवाडी नावाच्या शिवारात ही जनावरे दररोज चरण्यासाठी सोडली जातात. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांतूनही तेथे जनावरे चरायला घेऊन शेतकरी येतात. जवळच असलेल्या ओढ्यातील पाणी जनावरे पितात. मात्र गेल्या काही दिवसात अनेक जनावरे थरथर कापत आणि तोंडातून फेस येऊन जागीच मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जनावरे दगावल्याची घडलेली घटना ही त्यांच्या खाण्यात एखादा विषारी पदार्थ आल्याने घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काही जनावरे तेथे चरायला सोडलली नव्हती, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्ही प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांकडून या घटनेची माहिती घेऊन लसीकरण केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. हा साथीचा प्रकार नसून अन्न विषबाधेतून ही घटना घडल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)