निवड समितीच्या मनात चाललय तरी काय? – हरभजन सिंगचा सवाल

वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघ निवडीवरून बीसीसीआयवर टीका

नवी दिल्ली: वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात आक्रमक सलामी फलंदाज रोहित शर्माची निवड करण्यात आलेली नाही. हा मुद्दा आता चांगलाच तापू लागला आहे. रोहितला संघात संधी न मिळाल्याबद्दल सर्वप्रथम माजी कर्णधार सौरव गांगुलीने आश्‍चर्य व्यक्‍त केले होते. रोहितला का संधी मिळाली नाही, असा प्रश्‍न गांगुलीनंतर आता हरभजनलाही पडला आहे.

-Ads-

 

रोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. भारताचे हे सातवे आशिया चषक जेतेपद ठरले. इतकेच नव्हे तर रोहितने या संपूर्ण स्पर्धेत फलंदाज म्हणूनही सातत्यपूर्ण कामगिरी केली. तरीही वेस्ट इंडीज कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनी संघनिवडीवर आक्षेप घेतला आहे.

निवड समितीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली. यामध्ये आशिया चषक स्पकर्धेतील भारताच्या विजयाचे प्रमुख शिलेदार रोहित शर्मा व शिखर धवन यांना संघात संधी मिळाली नाही. रोहितला तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही निवडण्यात आले नव्हते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या संघात मोठे बदल झाले असले, तरी रोहितकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

रोहितला संधी न मिळाल्याबद्दल माजी फिरकी गोलंदाज हरभजनने ट्‌वीट करून आपली नाराजी व्यक्‍त केली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, रोहितला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. निवड समिती कसला विचार करत आहे, याचा कुणाला अंदाज येतो का? याचे उत्तर जर मिळाले तर कृपया ते मला सांगावे. कारण, निवड समितीचा निर्णय माझ्या पचनी पडेनासा झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने चार दिवसांपूर्वीच आशिया चषक उंचावला होता. तो खेळाडू अचानक नकोसा का होतो?

दरम्यान, रोहित शर्माने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा करताना तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. रोहितने या मालिकेत चार डावांत 78 धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर रोहितला कसोटी संघात संधीच मिळालेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)