निवडलेल्या करिअरबाबत चिकाटीने काम केल्यास ओळख मिळेल – सर रिचर्ड जॉन रॉबर्टस

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न

मुंबई: आपण निवडलेल्या करिअरबाबत लोक काय म्हणतील,करिअरमध्ये यश मिळेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा निवडलेल्या क्षेत्रात चिकाटीने काम करीत राहिलात तर तुमच्या कामामुळे तुम्हाला ओळख मिळेल, असे नोबल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यांनी दीक्षांत समारंभाच्या वेळी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोबल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलसचिव डॉ. सुनील भिरुड, डॉ. अर्जुन घाटुळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यावेळी बोलताना म्हणाले, मी केलेल्या कामाबाबत मला सन्मान मिळेल की नाही यापेक्षा मी माझ्या नोबेल पारितोषिकामुळे मला वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो. समाजासाठी काय काम करणे आवश्यक आहे हे समजणे ही मोठी गोष्ट आहे. आजचे विद्यार्थी हुशार असून योग्य संधी कशी निवडायची हे त्यांना माहित आहे. मात्र असे जरी असले तरी आपल्या पारितोषिकाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी होणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा

सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यावेळी म्हणाले, आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेली संधी जितकी महत्त्वाची असते, तितकीच तुम्हाला वेळोवेळी नशीबाने दिलेली साथही महत्त्वाची ठरते. आपण आपले काम चिकाटीने करीत राहिलो की वेगवेगळ्या संधी समोर येतात. त्यावेळी मात्र जिद्दीने आपले पॅशन आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, हे आजच्या विद्यार्थ्यांनी ओळखणे आवश्यक आहे. जे ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी निश्चित ध्येय असेल तर आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण संधी म्हणून पाहतो. त्यामुळे दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.

आपली आवड ओळखा

सर रिचर्ड जॉन रॉबर्टस स्वत:बाबत सांगताना म्हणाले, लहानपणापासूनच मला कोडे, वेगवेगळे खेळ आणि गणिताची आवड होती. थोडे मोठे झाल्यावर आपण डिक्टेटिव्ह व्हावे असे वाटू लागले. अजून पुढे मोठे झाल्यावर रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली आणि मग रसायनशास्त्रात पुढे‍ शिकत जाऊन ऑर्गनिक केमिस्ट्रीमध्ये मी पीएचडी पूर्ण केली. मी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश न घेता नशीबाने विसकोनसिन विद्यापीठात शिकायला गेलो आणि मी माझ्या विद्यापीठाचा पहिला विद्यार्थी आहे, की ज्याला नोबेल पारितोषिक मिळाले आहे. येणाऱ्या काळात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक मिळावे अशी माझी इच्छा आहे.

आज झालेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांतील 1 लाख 93 हजार 589स्नातकांना पदव्या देण्यात आल्या. 332 स्नातकांना पीएचडी आणि एम फिल तर52 विद्यार्थ्यांना पदके देण्यात आली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन करण्यात आले. 13 जानेवारी 2019 रोजी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)