निवडणूक प्रक्रियेत “चुकीला माफी नाही’

जिल्हाधिकारी सौरभ राव ः पुरंदर तालुक्‍यातील प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक कर्मचाऱ्यांना इशारा
वाघापूर -निवडणूक प्रक्रिया जेवढी अवघड आहे तेवढीच सोपी आहे. जो कर्मचारी ही प्रक्रिया समजावून घेऊन त्याप्रमाणे काम करणार नाही त्यांना ती अवघड जाणार आहे. तर जे कर्मचारी बारकाईने माहिती घेऊन त्याप्रमाणे काम करतील त्यांना ती अधिक सोपी जाईल. व्होटिंग मशीन उघडण्यापासून बंद करेपर्यंत प्रक्रिया समजावून घ्यावी, कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकाऱ्यांना विचारण्यास कचरू नये. मात्र, केवळ त्याकडे दुर्लक्ष केल्यास अथवा काही चुका झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्या कर्मचाऱ्यास कोणत्याही परिस्थितीत क्षमा केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे.
सासवड येथील आचार्य अत्रे भवनमध्ये पुरंदर तालुक्‍यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक प्रक्रिया शांत वातावरणात पार पडण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी, गतविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक, त्याचप्रमाणे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक निवडणूक वेगवेगळे अनुभव येतात व त्यातून नवीन शिकायला मिळत असते. त्यामुळे या प्रक्रियेकडे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. कर्मचाऱ्यांना शासनाकडून पूर्ण सहकार्य तसेच मदत दिली जाईल. निवडणूक प्रक्रिया काय असते याबाबत अनेक वेळा अनुभव आलेला आहे. त्यामुळे त्यात नवीन असे काही नाही. मात्र त्याचे वेगळेपण शिकून घ्यावे.
प्रांताधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी सांगितले की, प्रत्येक निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मतदान यंत्रे देतानाच मतपत्रिका दिल्या जातील. 20 तारखेपूर्वीच मतपत्रिका पोहोचतील अशा पद्धतीने पोस्टल मतदान करून घ्यावे. पोस्टल मतदान हे गुप्तपणे होईल याबाबत कोणतीही शंका बाळगू नये. यावेळी त्यांनी संपूर्ण मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी, कोणकोणत्या सूचना व सावधानता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा करून प्रक्रियेची पाहणी केली. दरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबत यापूर्वी पहिले प्रशिक्षण 5 फेब्रुवारी रोजी देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. तर तिसरे प्रशिक्षण (दि. 20) रोजी देण्यात येईल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)