निवडणूक कार्यकर्त्यांची, बांधणी लोकसभा अन्‌ विधानसभेची

बहुमताचा जादूई आकडा गाठणे सर्वच पक्षांना अवघड ः मतविभागणीचा फायदा होणार का?

जयंत कुलकर्णी

नगर – गेल्या आठ महिन्यांपूर्वी केडगाव पोटनिवडणूक निकालानंतर झालेल्या दुहेरी हत्याकांडाचे पडसाद आजही महापालिका निवडणुकीत उमटल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे निवडणुकीत राजकीय पक्ष दबावाखाली होते. तसेच नगरकरांमध्ये निवडणुकीबाबत निरुत्साह जाणव आहे. महापालिका निवडणुकी तशी कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते. त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी दिवसरात्र एक करून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. तसे पाहिले तर ही निवडणूक नेत्यांसाठी लोकसभा व विधानसभेची बांधणी करणारी ठरली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नेत्यांनी तरी या निवडणुकीकडे त्या दृष्टीने पाहिले आहे. भाजप व शिवसेना नेत्यांनी देखील ही निवडणूक आगामी निवडणुकांसाठी रंगीत तालीम म्हणून पाहिले असेल तरी त्यांनी महापालिका निवडणूक गांभीर्याने घेतली.
सध्या तरी शिवसेना व भाजप यांच्यात सत्तेसाठी चुरस दिसत आहे. परंतू गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाजप पक्षांतर्गत कुरघोडी सुरू झाली आहे. मनमानी पद्धतीने करणाऱ्यात आलेल्या तिकीट वाटपाचा वचपा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बहुतांशी प्रभागात पक्षाचे जुने व निष्ठावंत नेत्यांसह कार्यकर्ते तसेच संघ परिवारचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात तर अपक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांना मदत करीत आहे. त्यामुळे भाजपचा सर्वांधिक जागा घेण्याचे स्वप्न बारगळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना व आघाडी अशी तिरंगी लढत झाली. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेच्या विरोधात भाजप व आघाडी असे चित्र निर्माण झाले आहे. अर्थात शिवसेनेने देखील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसची छुप्पी युती असल्याचा आरोप केला आहे.

प्रभागनिहाय उमेदवार पाहिल्यास शिवसेनेच्या आरोप तथ्य वाटते. केडगावमध्ये एकही उमेदवार राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात दिला नाही. ज्या प्रभागात राष्ट्रवादीचे प्रभावी उमेदवार आहे तेथे भाजपचे लिंबुटिंबू उमेदवार दिसत आहे. तरी स्थिती भाजपच्या प्रभावी उमेदवारांबाबत राष्ट्रवादी देखील निभावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेची सर्वच प्रभागात अडचण झाली आहे.

उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर दि. 27 नोव्हेंबरपासून जाहीरपणे प्रचाराला प्रारंभ झाला होता. परंतू शेवटचे दोन दिवस शहरात प्रचार सभा व प्रचाराचा ज्वर दिसू आला. शहर विकासाचे मुद्दे फार या निवडणुकीत झाले नाही. दरनिवडणूकीप्रमाणे भयमुक्‍त नगर शहर व गुंडगिरी यावर आरोप-प्रत्यारोप झाले. ज्या महापालिकेवर 78 कोटींचे देणी आहेत. विकास कामांसाठी निधी नाही. अशा दिवाळखोर महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून कोट्यवधीचा चुराडा करण्यात आला आहे.

एवढा खर्च का आणि कशासाठी याचे आत्मपरिक्षण केले तर शहर विकासापेक्षाही हॉटेल व्यवसाय, जमिन खरेदीविक्री यासह अन्य व्यवसायांसाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे वास्तसमोर येते. ही निवडणुक लोकसभा व विधानसभेची बांधणी म्हणून पाहिले गेले. त्या दृष्टीने राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न झाले. लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे इच्छुक आहे. त्यानुसार त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. यामाध्यमातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी जवळीक झाली. डॉ. विखेंचा लोकसभेचा तर आ. जगताप यांचा विधानसभेचा मार्ग त्यातून सुकर करण्याचा प्रयत्न झाला आहे.

शिवसेनेकडून लोकसभेसाठी श्रीगोंद्याचे घनश्‍याम शेलार यांची उमेदवार निश्‍चित मानली जात आहे. त्यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेवून सर्वच पातळ्यावर काम केले. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने तर अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ही निवडणुकी हताळली. भाजपने मात्र कोअर कमिटी केली होती. पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार सुजितसिंह ठाकूर, खा. दिलीप गांधी या प्रमुख नेत्यांसह ऍड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा याचा समावेश होता. परंतू खा. गांधी यांची चलती होती. त्यांनी ठरविलेले उमेदवार कोअर कमिटीला द्यावे लागले. त्यामुळे या निवडणुकीत खा. गांधी यांचा पक्षात वरचष्मा राहिला.

नाराज असूनही काही बोलता येत नव्हते. मनमानी पद्धतीने खा. गांधी यांनी आपली कार्यपद्धती राबविली. अर्थात त्यांनी लोकसभेचे गणित मांडून तसेच सुपुत्र सुवेंद्र गांधी यांचा महापालिकेतील महापौरपदाचा मार्ग सुकर करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला. परंतू त्याला आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी खो घालण्याचा प्रयत्न केला. महापालिकेत भाजपची सत्ता आणणार पण गांधी महापौर होणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे.

या निवडणुकीत कार्यकर्ते आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. पण नेत्यांची गणिते ही आगामी निवडणुकीची पेरणी करण्याची होती. असे चित्र या निवडणुकीत दिसून आले आहे. या निवडणुकीत केडगावचा राजकीय भूकंप हा महत्वाचा मानला जात आहे. या भूकंपातून भाजपला फायदा झाला तर ठिक अन्यना केडगावकरांचे राजकीय अस्तित्व संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे केडगावमधील भाजपच्या सर्व जागा येण्याच्या दृष्टीने खुद्द आ. कर्डिले प्रयत्नशिल आहेत.भाजपने या निवडणुकीत सर्वच पातळ्यांचा सरार्स वापर केला आहे.

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींचा फोटो थेट पंतप्रधान नरेंद्र मोंदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पगतीत लावण्यात आला आहे. याचे पडसाद एकट्या केडगावमध्ये नाही तर शहरात देखील उमटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यातून शहरात जुने व भाजपचे निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांसह संघ परिवाराने भाजपच्या विरोधात मोहिम सुरू केली आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

भाजपने सर्वच पातळ्यावर आघाडी घेवून सर्वांधिक जागेचा दावा केला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने देखील तो दावा केला आहे. परंतू ज्या पद्धतीने भाजपने प्रयत्न केले तसे प्रयत्न व नियोजन शिवसेना व राष्ट्रवादीचे दिसून आले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वरवर नियोजन झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारांवर पक्षाची मोठी भिस्त आहे. त्याच्या अस्तित्वासाठी ते लढत आहे. आता ते आपला विजय देखील खेचून आणणार का असा हे आता येत्या 10 तारखेला निकालानंतर स्पष्ट होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)