निवडणुकीतील काळ्यापैशाचा वापर
नवी दिल्ली – निवडणूकीतील काळ्यापैशाचा वापर रोखण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी म्हटले आहे. फेक न्युज, डाटा चोरी अशी प्रकरणे देशातील निवडणुक प्रकियेतील मोठी आव्हाने ठरणार आहेत असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भारतीय निवडणूक प्रक्रियेपुढील आव्हाने या विषयावर आयोजित एका परिसंवादात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की सणकीवर लोकशाही चालवता येत नाही. त्यासाठी धैर्य, चारित्र्य, निष्ठा, महिती अशाही वैशिष्टांची गरज आहे. पण ही वैशिष्ट्येच सध्या गायब होताना दिसत आहेत. ही गंभीर बाब आहे. देशातील निवडणूक प्रक्रिया गैरप्रकारांनी दूषित होणार असेल तर तिच्यावर देशातील सामान्य माणसांचा विश्‍वास बसणार नाही. तो या प्रक्रियेवर उद्विग्न होईल. हीच आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. ते म्हणाले की आज साधनांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीतून त्यात गैरप्रकारही वाढले आहेत.

डाटा चोरी, फेक न्युज, एका विशिष्ट मुद्‌द्‌याला लक्ष्य करून सातत्याने त्या माहितीचा मारा करणे, सोशल मिडीयातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा हे सारे प्रकार लोकांची मते कलुषित करण्याचे प्रकार असून त्यातून त्यांचे योग्य सरकार निवडण्याचे भानही गमावले जाण्याची शक्‍यता आहे.

हाच निवडणूक प्रक्रियेला आणि लोकशाहींला मोठा धोका आहे. निवडणुकीत पैशाचा आणि काळ्यापैशाचा बेसुमार वापर होतो आहे त्याविषयी ओरड खूप होते पण त्याला आळा घालण्यासाठी पुरेसे कायदेच आज उपलब्ध नाहींत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)