निवडणुक आली की यांना राम आठवतो ; अजित पवारांची भाजप-शिवसेनेवर टीका 

File Photo
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजप-शिवसेनेवर टीका 
सोमेश्वरनगर: निवडणूक आली की यांना राम आठवतो. हे लोक राम घेऊन येतात. निवडणुकीत मतं मिळतात. नंतर मात्र रामाला वनवासात पाठवतात, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेवर केला. शैक्षणिक धोरण नीट नसल्याने शिक्षणाची कोंडी झाली असून महाविद्यालये अडचणीत आली आहेत. शिक्षणमंत्री विनोत तावडे हेच शिक्षकांना चोर तर संस्थाचालकांना दरोडेखोर म्हणतात. काय कारभार आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
 
मु. सा. काकडे महाविद्यालयास माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे यांनी सभागृह बांधून देण्याचे निश्‍चित केले आहे. या इमारतीचा पायाभरणी समारंभ पवार यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी राज्य पणन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शामकाका काकडे होते. याप्रसंगी जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी अध्यक्ष सतीश खोमणे, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, नंदा सकुंडे, जितेंद्र सकुंडे, लालासाहेब माळशिकारे, लक्ष्मण गोफणे, भरत खैरे, प्रमोद काकडे आदी उपस्थित होते. 
अजित पवार म्हणाले की, राज्यात जिल्हा परिषद शाळा, शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षकांच्या काही लाख जागा रिकाम्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. समाजातला एकही घटक समाधानी नाही. पाणी, शेती यासाठी आंदोलने होत आहेत. उसाच्या भावासाठी शेतकरी रस्त्यावर आला आहे. शिक्षणक्षेत्राचीही चोहोबाजूने कोंडी केली आहे. एकीकडे शिष्यवृत्तीचे पैसे द्यायचे नाहीत आणि शिष्यवृत्तीधारक मुलास प्रवेश नाकारला तर कारवाई करायची, असे धोरण आहे. अरे प्रवेशाची अडचण नाही पण पैसे तरी द्या ना. अशा कारणांनीच सिंहगडसारख्या नावाजलेल्या महाविद्यालयासह अनेक महाविद्यालयांची कोंडी झाली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून पैसे येतात. काकडे महाविद्यालयाचे 40 लाख, विद्या प्रतिष्ठानचे कोटीच्या पुढे, रयतचे काहीशे कोटी बाकी आहेत. महाविद्यालये कशी चालवायची, असा सवालही पवार यांनी केला. 
याप्रसंगी पवार यांनी, समाजात दानत नाही. निवडणुकीत माणसे कितीही पैसा उधळतात. नोटा दाखवून निवडून येतात आणि नंतर मग काहीच काम करत नाहीत. परंतु, दुसरीकडे आर. एन. शिंदे हे मात्र समाजासाठी पैसा वापरतात, त्यांनी कोट्यवधीची कामे गरजुंसाठी केली, त्यांना बारामतीकरांच्या वतीने सलाम. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 
महामार्गाला आम्हीच नाव देवू… 
सध्या, समृद्धी महामार्गावरुन भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये नावाच्या वादावरुन वाद चालू आहे. काम सुरू होण्यापूर्वीच श्रेय घेण्याबरोबर नावाचा वाद विकोपाला जाण्याची स्थिती आहे. विकासकामात या गोष्टी बऱ्या नव्हेत, असे सांगून तुमचे राहू द्या आता. या महामार्गाला नाव आम्हीच देवू, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार यांनी येथील कार्यक्रमात व्यक्त केला. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)