निवडणुकीत भाजपचा हायटेक प्रचार ; प्रचाराच्या नियोजनासाठी स्वतंत्र वॉर-रूम 

भाजपच्या टॅगलाईन शहरात जोरदार चर्चेत ; प्रचाराच्या नियोजनासाठी स्वतंत्र वॉर-रूम 

नगर -कोणत्याही परिस्थितीत यंदा महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याच्या त्वेषाने उतरलेल्या भाजपने प्रचाराच्या नियोजनासाठी वॉररूम तयार केली. महापालिकेच्या प्रचारात उतरणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचे आणि रोड-शोचे नियोजन करण्याबरोबरच विविध टप्प्यात प्रचाराची दिशा ठरवण्याचे काम या वॉररूममार्फत करण्यात येणार आहे. याशिवाय पारंपरिक प्रचारासोबतच होर्डिंग कॅम्पेन, फेसबुक, व्हॅट्‌सऍप आणि ट्‌वीटरसारख्या ऍप्सच्या माध्यमातून सोशल मिडियावरील हायटेक प्रचार भाजप करीत आहे.

मुंबईत हिवाळी अधिवेशनाची धामधूम असतानाच नगर महापालिकेचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. प्रचारादरम्यान दर दिवशी राज्य पातळीवरील किमान एका बड्या नेत्यांची हजेरी शहरात रहावी, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची शक्‍यता लक्षात घेता त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. याशिवाय विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीची यंत्रणाही उभारली जात आहे. तसेच प्रभागनिहाय रोड शो आणि रॅलीचे वेळापत्रकही ठरवले जात आहे. हे करत असतानाच मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवरही भाजपने लक्ष दिले असून पक्षाचे स्थानिक पदाधिकारी घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार करत आहेत.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत बेकायदा ऑनलाईन प्रचाराला आळा घालण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पोलीसांना दिले आहेत. त्या अनुषंगाने वॉटस्‌ अप्‌ ग्रुप, फेसबुक, यु ट्यूब आणि ट्विटरसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर पोलीसांच्या सायबर क्राईमचा वॉच असणार आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील प्रचारासाठी आवश्‍यक असलेल्या योग्य त्या कायदेशीर परवानग्या मिळवून ऑनलाईन प्रचाराचा आराखडाही भाजपच्या वतीने तयार केला जात आहे. एकूणच प्रचाराची सगळी यंत्रणा भाजपने कामाला लावली असून सोबतच विरोधकांच्या हालचालींवरही नजर ठेवली जात आहे.
नगर शहराचे प्रमुख चौक, महत्वाचे रस्ते तसेच मोक्‍याच्या ठिकाणी होर्डिंग लावत भाजपने प्रचाराच्या प्रभावी माध्यमाचा वापर केला. परिवर्तन होणार, नगर बदलणार’ ही टॅगलाईन असलेले हे होर्डिंग कॅम्पेन नगरकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)