अमृत’चे पंप बसविण्यास उशीर
सोलापूर: उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडला असून शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे आगामी निवडणूकीत पुन्हा पाणी प्रश्न पेटणार आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर सोलापूरवर मोठे जलसंकट येऊ ठेपले आहे. औज बंधारा कोरडा पडला आहे. तसेच टाकळी इनटेकमधील पाणी 25 मार्चपर्यंत पुरणार आहे. जलसंपदा विभागाने औजमधील पाणी 10 एप्रिलपर्यंत पुरवावे, असे सांगितले. पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत कमालीचा फरक आहे. कर्नाटकातील गावे दररोज 70 एमएलडी पाण्याचा उपसा करीत आहेत. मंद्रुप येथील पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा सुरू आहे. औज बंधारा कोरडा पडल्याने उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडायला हवे. भाजपच्या दोन मंत्र्यांनी पाठपुरावा करायला हवा. पण तो केला जात नाही. हिप्परगा तलावही कोरडा पडला आहे.
उजनी पंपगृहातील सहापैकी चार पंप सुरू आहेत. दोन पंप पर्यायी पंप म्हणून ठेवले आहेत. कार्यरत असलेल्या दोन पंपांना मोठी गळती आहे. अमृत योजनेतून हे पंप बदलण्याचा निर्णय झाला. दोन महिन्यांपूर्वी पंप दाखल झाले आहेत. मात्र ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने यापूर्वीच हे पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत करणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. हे काम लवकर न झाल्यास शहराला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागेल. पंपगृहाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. सदर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.