निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश “सैराट’

प्रशांत चुयेकर
कार्यकर्ते सोडून गेलेल्या पक्षात “दंगल’ ः “ती सध्या काय करते’ चर्चेला उधाण

पिंपरी, दि. 12 – पिंपरी-चिचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठमोठी पदे मिळण्यासाठी नेत्यांच्या “सैराट’ पक्ष प्रवेश सुरू आहे, तर पोकळी निर्माण झालेल्या पक्षात मात्र “दंगल’ निर्माण झाली आहे. मतदार मात्र “ती (जनता) सध्या काय करते’ यावर सत्ता कोणाची ठरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 9 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसच्या 8 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तर भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे माजी महापौर आझम पानसरे यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकुणच नगरसेवक आणि पक्षाचे प्रमुख दावेदार असणारे गटप्रमुखच जेव्हा पक्ष बदलतात तेव्हा मात्र शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघते. शहराला थंडीने गारठले असले तरी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आपण असलेल्या पक्षात उमेदवारी मिळत नसली तर या पक्षात कशाला रहायचं म्हणून अनेक इच्छूक उमेदवार प्रभागाच्या प्रमुख मंडळीच्या विचारावर आपल्या निवडून देणाऱ्या मतदाराच्या जीवावर पक्ष बदलत आहे. भविष्याचे राहू दे पण आताच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळणार यासाठीही काहीजण पक्षत्याग करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. आपले कार्यकर्ते सोडून गेलेल्या पक्षात मात्र “दंगल’ निर्माण झाली आहे. पक्ष प्रवेशाने आपल्या पक्षाला काय तोटा होणार, गट प्रमुखांचा पक्ष प्रवेश मान्य आहे का जनता चांगल्या विचाराच्या पक्षा जवळच राहते, नेता म्हणजे पक्ष नव्हे, जनता त्यांच्या मागे जाणार नाही, अशी चर्चाही जोरात शहरात सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर “ती (जनता) सध्या काय करते’ याचीही चर्चा जोरात सुरु आहे.

भाजपचे निष्ठावंत दुखावले
बदलत्या वातावरणात शहरात सर्वत्र भाजपचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या पक्षात गेले तर विविध पदाचा लाभ होणार. विकास कामे करतानाही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तर आपल्या नको असलेल्या व्यवसायालाही धक्‍का पोहचू नये, म्हणून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीमध्ये आपल्याला कायम डावलले जाते, आपल्याला भविष्यात मोठ पद मिळणार आता राष्ट्रवादीमध्ये काही मिळणार नाही, अशा अपेक्षेनेही काही कार्यकर्ते आपल्या प्रमुखांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गळ घालत आहेत. केंद्रात आणि राज्यात आता पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप असेल म्हणून नेत्यांचा या पक्षात “सैराट’ प्रवेश होत आहे. प्रवेशामुळे नव्यांना संधी मिळणार हे स्पष्ट असल्याने भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते कमालीचे दुखावले आहेत.

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
पिंपरी-चिंचवड ही राष्ट्रवादीलाच अनुकूल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून राज्यात पहिल्या क्रमांकाची महापालिका झाली आहे. विकास कामांना जनताही खुश आहे, त्यामुळे या महापालिकेच खऱ्या अर्थाने अधिकाधिक विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीसोबतच असलेले बरे, असे म्हणत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. असहिष्णूतेच्या वातावरणापासून ते नोटा बंदीच्या वातावरणात भविष्यात भाजपचे काही खरे नाही, असा विचार करत भाजपमध्ये गेलेले प्रमुख नेतेही पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. राष्ट्रवादीचे बडे मोहरे भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. त्यात वाढ होण्याचीही शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कशी सावरणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)