निवडणुका आल्या की राम मंदिर आठवते : पृथ्वीराज चव्हाण

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) –चार वर्षे कुणाला राम मंदिर आठवत नाही. निवडणुका जवळ आल्या आणि परिस्थिती अडचणीची झाली की भाजपला आणि सगळ्यांनाच राम मंदीर आठवते, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच रामाच्या नावावर वारंवार मते मिळत नाहीत. भावनिक मुद्यांना हात घालून मते घ्यायचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
येथील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाबाबत बोलताना आ. चव्हाण म्हणाले, खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तीन-चार बैठक झाल्या आहेत. जागा वाटप प्रक्रियेचे ऐंशी टक्के काम झालेले आहे. काही जागांची प्राथमिक वाटणी करून नंतर उमेदवार पाहून काही ठिकाणी अदलाबदल करता येईल का, ते पाहू. भाजप आणि मोदींविरोधात देशभर एकास एस उमेदवार उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
मराठा आरक्षणाबाबत आमचा मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळाले तरी आमची काही हरकत नाही. मात्र, पुन्हा मराठा समाजाला फसविले तर समाज माफ करणार नाही, असे सांगून आ. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सोयीस्करपणे जबाबदारी झटकून ती एका ज्युनिअर मंत्र्याकडे दिलेली आहे. कायदा संमत करायचा असला तर तो कॅबिनेटपुढे यायला पाहिजे. तो परस्पर संमत करणे योग्य होणार नाही. तो जीआर पुन्हा तपासला पाहिजे. दोन-चार दिवसांत आरक्षणाबाबतचा जो कायदा तयार होईल, तो पूर्ण मंत्रीमंडळापुढे आला पाहिजे. त्याबद्दल मतभेद असतील. परंतु, मंत्रीमंडळानेच तो कायदा पास करून विधीमंडळाकडे आणला पाहिजे. त्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी आमची तयारी आहे. तथापि, सरकारने काही पूर्व तयारी केलेली नाही. चार वर्षे वाया घालविली. ज्यावेळी अहवाल येणार होता. त्यावेळी नकार किंवा होकार, असे दोनच निष्कर्ष निघणार होते. होकार दिल्यावर कायदा करायचा होता. मग कायद्याची तयारी का केली नाही? त्यामुळे कुठे तरी पाल चुकचुकतेय, असे मला वाटते. तरीही आमचा मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)